जिल्हाधिकारी साहेबांनी चाड्यावर मुठ धरून पेरलेले “सोयाबीन” आज पावसात वाहून गेले; खंडाळ्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा!

अहवाल कधी पाठवणार आणि नुकसानभरपाई कधी मिळणार? :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.०७) — बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः चाड्यावर मुठ धरत “सोयाबीन”ची पेरणी केली होती. त्या वेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचा दिलासा दिला, आणि त्या कृतीचं सर्वत्र कौतुकही झालं.
मात्र, काही महिन्यांतच परिस्थिती उलटी झाली आहे. अतिवृष्टीमुळे खंडाळा परिसरातील सुमारे ५०० एकर जमीन नापिक झाली आहे. पिक पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून पुढचं पिक घेण्याचीही शक्यता नाही, अशी शेतकऱ्यांची हतबल अवस्था आहे.
“सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं म्हणतंय, पण प्रत्यक्षात मदतीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हातात पडलेला नाही. पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत, मग दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार कशी?” असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी उपस्थित केला.
—
६ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान – पण अजूनही पंचनामे प्रलंबित!
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी १४ जून रोजी खंडाळा येथे प्रत्यक्ष पेरणी केली होती. त्यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र आता तेच शेतकरी प्रशासनाच्या दारात फिरत आहेत.
बीड जिल्ह्यातील प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ६ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झालं आहे. शासनाने दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा केली असली, तरी महसूल विभागाच्या टाळाटाळीमुळे ती शक्य दिसत नाही.
“कागदोपत्री दिलासा देणं थांबवा; शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत कधी पडणार?” असा जळजळीत प्रश्न डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.



