जामखेडमध्ये नववर्षाच्या शुभदिनी;प्रांजल अमित चिंतामणी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्विकारणार

जामखेडमध्ये नववर्षाच्या शुभदिनी;प्रांजल अमित चिंतामणी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्विकारणार
दुहेरी उत्सव! प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस आणि नगराध्यक्ष पदग्रहण
जामखेड : नववर्षाचा पहिला दिवस… आणि जामखेडमध्ये राजकीय रंगत शिगेला! जामखेड नगरपरिषदेत नवीन नेतृत्वाचे पदार्पण होत असून नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी या आज (१ जानेवारी २०२६) नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून शहरभर या सोहळ्याची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे, आजच दि.१ जानेवारी प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस असल्याने जामखेडमध्ये दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साजरा होणाऱ्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड मिळतेच, पण यावर्षी या दिवशीच नगराध्यक्ष पदग्रहणाचा सोहळा रंगणार असल्याने उत्साहाला वेगळीच उंची मिळाली आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून प्रांजल अमित चिंतामणी यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला. भाजपचे तब्बल १५ नगरसेवक निवडून आल्याने नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळाले असून परिणामी जामखेडमध्ये भाजपचे वर्चस्व ठळकपणे दिसून येत आहे. प्रांजल चिंतामणी यांच्या नेतृत्वाकडून विकासवेगाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळी पदग्रहण सोहळा पार पडणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शहरभर या सोहळ्याची उत्सुकता असून नववर्षाचा पहिलाच दिवस जामखेडकरांसाठी संस्मरणीय ठरणार, यात शंका नाही!



