बीड

तपनेश्वर जि.प.शाळेत ‘पहिले पाऊल’ पूर्वतयारी मेळावा उत्साहात

तपनेश्वर जि.प.शाळेत ‘पहिले पाऊल’ पूर्वतयारी मेळावा उत्साहात

जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तपनेश्वर येथे सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी ‘पहिले पाऊल’ शाळास्तर शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला.

यानिमित्त इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सवही मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनात्मक, भाषा विकास तसेच गणन पूर्वतयारी या विविध क्षेत्रांनुसार क्षमतांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत विकासपत्र तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे,उपाध्यापक प्रताप पवार तसेच उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे तसेच अंगणवाडी सेविका शुभांगी अडाले व मदतनीस शिवकन्या राजगुरु आदी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे यांनी बोलताना सांगितले की,लहान वयातच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासाचा पाया भक्कम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व बालमैत्रीपूर्ण शिक्षण दिले जात असून, पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश निःसंकोचपणे येथे करून घ्यावा.

यावेळी बोलताना अध्यक्ष धनराज पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.तपनेश्वर परिसरातील पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश जि.प. शाळेत करून घ्यावा.

Back to top button