बीड

वंचितचे बहुजन आघाडीचे आमरण उपोषण ; निखिल कन्स्ट्रक्शनवर कारवाई, तहसीलदारांचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

वंचितचे बहुजन आघाडीचे आमरण उपोषण ; निखिल कन्स्ट्रक्शनवर कारवाई, तहसीलदारांचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

जामखेड (प्रतिनिधी) :श्री निखिल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक २४ जून २०२५ रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष आतिश (दादा) पारवे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
या प्रकरणी श्री निखिल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व दोषींवर कठोर कारवाई करावी, मुरूमाचे पैसे वसूल करून शेतात माती टाकावी, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार गणेश माळी यांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल व शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी लोकाधिकार प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ,उमा जाधव,शेख समीर, नासिर सय्यद, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार, त्रिंबक कुमटकर, प्राचार्य विकी घायतडक, प्रा. कुंडल राळेभात, ॲड. हर्षल डोके, ॲड. महारूद्र नागरगोजे, ॲड.प्रविण ससाणे, उपसरपंच सर्जेराव गंगावणे बापूसाहेब कार्ले, केदार रसाळ, किशोर ससाणे, सचिन भिंगारदिवे, सदाशिव हजारे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र जाधव, अरविंद जाधव, संतोष पवार, नंदकुमार खरात, नंदकुमार आव्हाड, भोसले अविनाश, सुर्यकांत सदाफुले, सोहेल काझी, संतोष शेगर, आप्पासाहेब निगुडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाबत माहिती अशी की,रत्नापूर (ता. जामखेड) येथील शेख इन्नुस शेखलाल यांची पत्नी हवाबी इन्नुस शेख यांच्या नावावरील गट क्र. ५५४ मधील मुरूम श्री निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने जामखेड-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्गासाठी वापरला होता. ठरल्याप्रमाणे मोबदल्यात काळी माती शेतात टाकणे किंवा ३०० रुपये प्रति ब्रास दराने रक्कम देणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीचे व्यवस्थापक प्रसाद शेळके यांनी शेतकऱ्याच्या सततच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय शासकीय कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या फसवणुकीमुळे शेख कुटुंबीयांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून दोन वर्षांपासून सुमारे ४०० ब्रास मुरूम उचलून नेल्यामुळे शेतात जवळपास २० फूट खोल खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे शेती करता येणे अशक्य झाले आहे.

Back to top button