पिछडा मुस्लिम (पसमांदा) जोड़ो अभियान’ची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न

पिछडा मुस्लिम (पसमांदा) जोड़ो अभियान’ची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे भारतीय जनता पक्षातील विविध पदांवर काम करणाऱ्या पसमांदा समाजातील पदाधिकाऱ्यांनी ‘मोदीजींचा पैगाम… पसमांदांच्या नावाने…’ या घोषवाक्याखाली महाराष्ट्रातील पसमांदा समाज जोडो अभियानाचा शुभारंभ केला.
या उपक्रमाअंतर्गत एक ‘कोअर कमिटी’ स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र नोटरी समितीचे विद्यमान अध्यक्ष ॲड. सिकंदर अली यांनी भूषवले. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज देशमुख यांचीही उपस्थिती होती. प्रस्ताविक भाषण प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष व राज्य हज समितीचे सदस्य सलीम बागवान यांनी केले. त्यांनी पसमांदा समाजासाठी या संघटनेच्या महत्त्वाच्या भूमिकांवर प्रकाश टाकला.
भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य आणि विदर्भ प्रांत प्रमुख रमजान अन्सारी यांनी पसमांदा समाजाच्या गेल्या ७० वर्षांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शोषणावर भाष्य केले. काँग्रेस आणि तथाकथित सेक्युलर पक्षांनी या समाजाला फक्त मतबँक म्हणून वापरल्याचा आरोप करत, पसमांदा समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील १ कोटी ८० लाख पसमांदा बांधवांपर्यंत मोदीजींचा संदेश पोहोचविण्याचे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेसाठी ॲड. सिकंदर अली व ॲड. जहीर खान यांनी पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.
आबेद अली चौधरी यांनी शासनाच्या योजना पसमांदा समाजापर्यंत पोहोचत आहेत का, यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. तसेच विरोधकांकडून पसमांदा समाजाला दिशाभूल करणारे खोटे प्रचार त्वरित खोडून काढण्याची गरजही व्यक्त केली.
महिला नेत्या सारिका कुरेशी यांनी पसमांदा समाजातील महिलांना लघुउद्योगाशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. अकबर शहा आणि सलीम चिश्ती यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीस महाराष्ट्रातील विविध प्रांतांतील कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. त्यात लियाकत बागवान (नंदुरबार), अकबर शाह (नाशिक), श्रीमती नाझिया तांबोली (मुंबई-ठाणे), जे. डी. शाह (बीड), अशफाक पठाण (छ. संभाजीनगर), ॲड. जहीर चौधरी (उस्मानाबाद), नजीर मंसुरी (भिवंडी), अफजल दाऊपानी (मुंबई), आबेद अली चौधरी (ठाणे), श्रीमती सुलताना समीर खान (मीरा-भाईंदर), इफ्तेखार अतार (रायगड), श्रीमती जरीना शेख (रत्नागिरी), अशफाक अन्सारी (नागपूर), डॉ. इरफान कुंदन फुलसावंगी (यवतमाळ), श्रीमती सारिका कुरेशी (नागपूर), श्रीमती शबाना सोलंकी (यवतमाळ), बबलू हुसैनी (गडचिरोली), सलीम चिश्ती (छ. संभाजीनगर) आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात आगामी कार्ययोजनाही ठरविण्यात आली. ॲड. जहीर चौधरी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ३८ पसमांदा जमातींचे एकत्रीकरण करून जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर समाजजागृतीला सुरुवात करण्याचे आवाहन केले. शेवटी त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



