बीड

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने यथोचित सन्मान. 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने यथोचित सन्मान.

 महाकाळा येथे दि:05/12/2025 रोजी मनोज जरांगे यांच्या निवासस्थानी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीयुत. अशोक कचरु आठवले यांच्या नेतृत्वात दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत मराठा समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांप्रती सदैव सजग व जागरूक राहून अथक परिश्रमाने संघर्षाचा लढा देणारे अंतरवली सराटी येथील संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना संविधान अमृत महोत्सवी अवचित्याने भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेने सन्मानित करण्यात आले. सन्मानित करताना दिव्यांग कर्मचारी संघटना शिष्टमंडळामधे दिव्यांग कर्मचारी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष अजिनाथ हाडुळे, सचिव दिनेश गाडे, जरांगे यांचे विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले, समाधान घरत इ. दिव्यांग कर्मचारी संघटना पदाधिकारी व समाजबांधवांचा प्रामुख्याने समावेश होता.
याप्रसंगी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी मनोज दादा जरांगे यांच्याशी उपेक्षित सामाजिक बांधवांच्या स्वावलंबन करण्याविषयीच्या लढ्याबाबत विस्तृत चर्चा करून,हयापुढे आपला लढा भारतीय संविधानाच्या अनुपालनाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही या स्वरूपाची जाणीव मनोज दादा जरांगे यांना आठवले यांनी करून आली. तसेच यापुढे मी माझ्या समाज बांधवांकरीता भारतीय संविधानातील तरतुदींचे अनुपालन करुनच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता यशस्वीरित्या प्रयत्न करण्यास कटिबद्ध राहील व दिव्यांग व्यक्तींप्रतिही सहानुभूतीपुर्वक प्रयत्न करुन शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची प्रतिपुर्ती करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यास कटिबद्ध राहील असे मनोज दादा जरांगे यांनी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. त्याचबरोबर शासनाच्या अखत्यारीतील दिव्यांग कर्मचारी / दिव्यांग व्यक्तींना उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीवही संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी मनोज दादा जरांगे यांना निवेदनाद्वारे करून दिली .
या निवेदनात दिनांक 01/11/2005 नंतर शासकीय- निमशासकीय सेवेत नियुक्त झालेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अधिनियम 1982 अन्वये सेवानिवृत्ती लाभ देण्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री‌. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पाठपुरावा करावा या स्वरूपाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा , विधान परिषदेत या विधीविषय सभागृहात कार्यकारी प्रणालीमध्ये दिव्यांग व्यक्तींना योग्य ते प्रतिनिधित्व देण्याबाबतीतही शासनाकडे पाठपुरावा करावा या स्वरूपाची मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना सर्व योजनेमध्ये ५% आरक्षणाची अमंलबजावणी कटाक्षाने करण्याबाबतीत कार्यवाही करणे व प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांसह सर्व घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना असलेले ५% आरक्षण विनाविलंब बहाल करणे बाबतीत कार्यवाही करणे याही मागण्यांचा निवेदनात प्रामुख्याने समावेश आहे.
अखेर शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे निवेदन मनोज दादा जरांगे यांनी स्विकृत करून निवेदनातील मागण्यांची प्रतिपुर्ती करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मा.श्रीयुत.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दि.08/12/2025 रोजी तात्काळ निवेदन पाठवण्यात येईल असे सांगितले. या स्वरूपाची माहिती दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी वृत्त प्रसिद्धीस्तव प्रसिद्धीपत्रकान्वय दिली आहे.
Back to top button