बीड
श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड कडून पर्यावरणपूरक रामनवमी: ‘एक भक्त – एक वृक्ष’ संकल्प

श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड कडून पर्यावरणपूरक रामनवमी: ‘एक भक्त – एक वृक्ष’ संकल्प
(रामनवमी निमित्त “एक भक्त – एक वृक्ष” संकल्प; रोपांचे प्रसाद स्वरूपात वाटप होणार )
बीड, प्रतिनिधी — प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड येथे विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. श्री क्षेत्र रामगड येथे परमपूज्य महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली “रामनवमीचा प्रसाद – एक पवित्र संकल्प” या संकल्पनेतून रोपांचे प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा मुख्य उद्देश “एक भक्त – एक वृक्ष” हा संदेश समाजात पोहोचविणे व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा आहे. रामनवमीच्या निमित्ताने भक्तांना रोपांचे वाटप करून वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी आर.एच.भोसले (अध्यक्ष, श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था) सौ सरोज गोपाळराव सोंडगे (सचिव, श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ब्रह्मनाथ मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.मनोजकुमार नवशे, डॉ.शंकर शिवशेट्टे, डॉ.प्रकाश कोंका यांचे मार्गदर्शन लाभणार असून NSS बीड जिल्हा समन्वयक डॉ.अरुण दैतकार तसेच NCC प्रमुख डॉ.लेफ्टनंट जगन्नाथ चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाद्वारे “एक झाड लावा – पर्यावरण वाचवा” हा संदेश देत भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी, नागरिक व भक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन रोपांचा प्रसाद स्वीकारावा व वृक्ष लागवड करून प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



