बीड
श्रीवर्धनमध्ये मासेमारी ठप्प! तिहेरी संकटामुळे मच्छीमार हतबल; ‘मासळी दुष्काळा’ची भीती

श्रीवर्धनमध्ये मासेमारी ठप्प! तिहेरी संकटामुळे मच्छीमार हतबल; ‘मासळी दुष्काळा’ची भीती
श्रीवर्धन (संदेश घोलप) :
कोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन तालुका सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून, समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मासेमारी जवळपास ठप्प झाली आहे. प्रचंड लाटा, वेगवान वारे आणि डिझेल दरवाढ या तिहेरी संकटामुळे स्थानिक मच्छीमार अक्षरशः हतबल झाले आहेत. परिणामी किनारपट्टीवर ‘मासळी दुष्काळ’सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुपारच्या सुमारास उत्तर ते दक्षिण दिशेने वाहणारे तीव्र वारे आणि समुद्रातील वाढलेले करंट यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. उंच उसळणाऱ्या लाटांमुळे बोटी समुद्रात उतरवणेही कठीण झाले आहे.
मच्छीमारांच्या मते, अशा परिस्थितीत खोल समुद्रात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे अनेकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव मासेमारी थांबवली आहे.
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर विक्रमी वाढ झाल्याने आधीच तोट्यात असलेला मत्स्य व्यवसाय आणखी अडचणीत आला आहे.मच्छीमारांचे म्हणणे आहे की, वाढत्या खर्चामुळे समुद्रात जाणे परवडेनासे झाले आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे समुद्रात मासळीचे प्रमाण अत्यंत घटले आहे. जाळी टाकूनही अपेक्षित मासळी मिळत नसल्याने अनेक वेळा हात रिकामेच परतावे लागत आहे.या परिस्थितीमुळे स्थानिक बाजारात ताज्या मासळीची कमतरता निर्माण झाली असून ‘मासळी दुष्काळ’ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.मासेमारी ठप्प झाल्यामुळे अनेक मच्छीमारांनी आपल्या बोटी बंदरातच उभ्या ठेवल्या आहेत. यामुळे केवळ मच्छीमारच नव्हे, तर त्यावर अवलंबून असलेले कामगार, विक्रेते आणि संबंधित व्यवसायही अडचणीत आले आहेत.
हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होत आहे.श्रीवर्धन हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण असून येथे ताजी मासळी हे प्रमुख आकर्षण आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पर्यटकांना ताजी मासळी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिक हॉटेल आणि पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.स्थानिकांनी प्रशासन आणि शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. डिझेल अनुदान, आर्थिक मदत आणि सुरक्षित मासेमारीसाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर श्रीवर्धन किनारपट्टीवर मोठे आर्थिक आणि सामाजिक संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक मच्छीमार-व्यावसायिक जीवन धंबा यांची प्रतिकिया:
स्थानिक मच्छीमार व व्यापारी जीवन धंबा यांनी सांगितले,
“सध्या समुद्रात जाणेच कठीण झाले आहे. वारे आणि लाटा खूप वाढल्या आहेत. जरी गेलो तरी मासळी मिळत नाही. त्यात डिझेलचे दर वाढल्यामुळे खर्च प्रचंड वाढला आहे. आम्ही पूर्णपणे अडचणीत आलो आहोत. सरकारने तातडीने मदत केली नाही तर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल.”



