जामखेडच्या बाजारपेठेचे रक्षण, कृती समितीचा लढा यशस्वी

जामखेडच्या बाजारपेठेचे रक्षण, कृती समितीचा लढा यशस्वी
नवीन आराखड्यासाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा – प्रा.मधुकर राळेभात
जामखेड: शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या हिताला धक्का लावणारा असल्याने तो रद्द करण्यात आला असून, नवीन आराखडा स्थानिकांचा विश्वास जिंकून तयार करण्यात येणार आहे. जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी ही माहिती दिली.
प्रारूप विकास आराखड्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान होत होते. बाजारपेठ उद्ध्वस्त होत होती, अनेक एन. ए. इमारती पाडल्या जाणार होत्या, तसेच रिंग रोड शहराच्या आतून जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होणार होत्या. या अन्यायकारक आराखड्याविरोधात १७ तारखेला सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मध्यस्थीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत मंत्री शिंदे यांनी नगररचना अधिकाऱ्यांना तात्काळ रिंग रोड शहराबाहेरून नेण्याच्या सूचना दिल्या तसेच हा आराखडा अन्यायकारक असल्याने तो रद्द करून नव्याने तयार करण्याचे आदेश दिले.
प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, “नवीन प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या विकासासाठी असावा, नागरिकांना अडचणीत आणणारा नसावा. त्यामुळे तो स्थानिकांच्या विश्वासाने आणि शहराच्या हिताचा विचार करून तयार केला जाईल.”



