बीड
ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावरच लोकं दगडं मारतात

ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावरच लोकं दगडं मारतात
मागच्या चार नोव्हेंबरला महाराष्ट्रातील ख्यातनाम समाजप्रबोधनकार, महाराष्ट्रभूषण ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला आणि तो महाराष्ट्रभरात चर्चेचा म्हणण्यापेक्षा टीकेचाच जास्त विषय ठरला. इंदुरीकरांनी त्या समारंभासाठी केलेला खर्च, त्यांच्या मुलीचा पोशाख, नवरदेव मुलाचे नाव आणि इतरही काही मुद्द्यांवरून इंदुरीकरांवर समाजमाध्यमांतून टीकेचा भडीमार झाला. महाराजांनी जे केलं ते चुकीचं की बरोबर हे ठरवण्यासाठी दोन्ही बाजुंनी युक्तिवादही झाले. मी महाराजांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही आणि त्यांचा आणि माझा थेट परिचय देखील नाही. त्यांच्या कीर्तनातील काही शब्दप्रयोग, वाक्ये असमर्थनीयच असतात. *भेदाभेद भ्रम अमंगळ* या वारकरी संतांच्या विचाराला आणि स्त्री पुरूष समानता या भारतीय संविधानाच्या तत्वाला छेद देणाऱ्या त्यांच्या वक्तव्यांचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांच्या ज्या गोष्टी पटतात त्या पटतातच आणि ज्या पटत नाहीत त्या नाहीच पटत. जे पटतं ते स्वीकारायचं आणि जे पटत नाही ते त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून सोडून द्यायचं. सर्वांना सर्वांच्या सर्वच गोष्टी पटतील असं नाही आणि तसी अपेक्षा करणंही चुकीचंच.
इंदुरीकर आणि वाद हे काही नवीन नाही. मागील एकतीस वर्षात ते अनेक वेळा अनेक कारणांनी वादात सापडलेले आहेत. पण म्हणून त्यांनी समाजाला दूर लोटलं नाही आणि समाजानेही त्यांना दूर लोटलं नाही. गुणदोषांसह स्वीकारलं. ते विनाकारण नव्हे. कोणाला त्यांच्यामध्ये काही दोष दिसणं स्वाभाविक आहे, तसे असतीलही पण त्याचबरोबरीने त्यांच्यामध्ये अनेक गुणही आहेत ज्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आणि लोकमान्य झाले. त्यांच्या विनोदी कीर्तन शैलीचं लोकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या भाषेविषयी आक्षेप असू शकतात पण त्यांच्या समाजाविषयीच्या तळमळीविषयी, कळवळ्याविषयी आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. *बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥* या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे मायबाप श्रोत्यांसाठी डोळ्यात पाणी आणून अगदी बेंबीच्या देठापासून तळमळीने प्रबोधन करणारी जी काही मोजकी मंडळी महाराष्ट्रात आहेत त्यात इंदुरीकर आघाडीवर आहेत. समाज ऐकत नाही असे दिसते तेव्हा, *किती सांगो तरी नायकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥* असे तुकोबांनी सुद्धा खडसावले होते पण ते तुकोबा होते हे इंदुरीकर आहेत तुलना करण्याचा किंवा बरोबरी करण्याचा प्रश्नच नाही. पण जनहितार्थ खोल काळजातून मुखात येणारे आणि मुखातून लोकांपर्यंत पोहोचणारे शब्द आणि त्या मागची भावना वाईट नसते हे मात्र निश्चित. उन्हात खेळणाऱ्या लेकराला वारंवार सांगूनही ते ऐकत नाही तेव्हा वैतागून आई म्हणते *तुला सावलीत मर म्हणते की* इथे शब्द नव्हे, भाषा नव्हे तर त्या मागची ममत्वाची भावना महत्वाची असते. इंदुरीकर ज्यांना वाईट बोलतात, शिव्या देतात ते त्यांच्यासमोर बसलेले असतात. त्यांच्या भोवताली बसलेले असतात. बऱ्याच वेळा अगदी त्यांच्या पायाजवळ बसलेले असतात. ते हसून ऐकतात त्यांना राग येत नाही कारण त्यांना इंदुरीकरांची भावना, तळमळ कळते पण वळत नाही. खरं बोललं तर लोकांना बरं वाटत नाही आणि बरं बोललं तर लोकांचं बरं होत नाही. प्रबोधनकाराणे बरं बोलायचं नसतं तर खरं बोलायचं असतं. लोकांना बरं वाटावं म्हणून बोलायचं नसतं तर लोकांचं बरं होण्यासाठी बोलायचं असतं. असं म्हटलं जातं की डॉक्टरने भीड ठेवली तर पेशंट वायाला जातो आणि वक्त्याने भीड ठेवली तर समाज वायाला जातो. या न्यायाने त्यांच्या भाषेविषयीचे आक्षेप जरी मान्य केले तरी इंदुरीकर जे बोलतात ते लोकहीसाठी आहे असं म्हणावं लागेल.
इंदुरीकर जे बोलतात ते आपल्या हिताचं आहे हे लोकांना कळतं, पटतं त्यामुळेच तर लोक गर्दी करतात. अगदी माळरानावरसुद्धा लाखाची गर्दी गोळा करणारे ते एकमेव कीर्तनकार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे गर्दी जमवायची म्हटलं की इंदुरीकरांना पर्याय नाही हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी सुरुवातीच्या काळात इंदुरीकर यांच्या कीर्तनाला तमाशा म्हटलं, हेटाळणी केली, असे वारकरी संप्रदायातील कितीतरी मोठी, नामांकित मंडळी इंदुरीकरांची तारीख मिळवण्यासाठी ताटकळत उभे राहिलेले अनेकांनी अनेक वेळा पाहिले.
त्यांच्या बोलण्यात परखडपणा असतो पण त्याचबरोबर सत्यही असते. ते कोणालाच, अगदी कोणाला सोडत नाहीत. लहान असो की मोठा. *नाही भीड भार । तुका म्हणे सान थोर।* यामुळे काय होते अनेकांची दुखरी नस दबते. त्याचा परिणाम म्हणजे इंदुरीकर कुठे थोडे फार चुकले की त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. तरीही ते पुढे चालत राहतात. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसनाधीनता खोटी प्रतिष्ठा, ऐपत नसताना चंगळवाद, समाजविघातक प्रवृत्ती, अनिष्ट प्रथा–परंपरा, खुळचट कल्पना यांना कीर्तनातून शक्य तेवढा विरोध करत राहतात.
पाच – दहा हजार वर्षांपूर्वी काय झाले हे सांगण्यापेक्षा, भाकडकथा पुराणकथा सांगण्यापेक्षा समाजाच्या वर्तमान दैनंदिन समस्या काय ? त्यासाठी काय करावे ? काय करू नये ? उज्वल भविष्यासाठी काय करायला हवं ? यावर त्यांचा भर असतो आणि ती काळाची गरज आहे. ऋण काढून सण साजरे करू नका, मोठे लग्न करू नका, दिखावा करू नका, कर्जबाजारी होऊ नका, आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका हे कोणासाठी होतं ? गोरगरिबांसाठी, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी. श्रीमंतांसाठी मुळीच नव्हतं. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी खुशाल मोठी लग्न करायला हरकत नाही कारण त्यावरही अनेकांचे संसार, घरंदारं चालतात. एकच नियम सर्वांना लागू पडेल असे कधीच नसते. ते परिस्थितीजण्य असावे एवढे मात्र निश्चित.
उत्तर भारतातून महाराष्ट्रात दरवर्षी काही निवळ भोंदूगिरी करणारे बुवा, बाबा, माँ येतात. कोट्यावधीचे पॅकेज ठरवून येतात. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडाचा बाजार मांडतात. वाटेल तशी फेकाफेकी करतात. त्यांना नामदेव, ज्ञानदेव, तुकोबा आदी वारकरी संत माहीती नसतात. वारकरी संप्रदाय माहिती नसतो. महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, भूगोल, वर्तमान समस्या काहीच माहिती नसतं. येतात, महाराष्ट्रात कोट्यावधी रुपये गोळा करतात आणि इथल्या लोकांना फसवून, दिशाभूल करून निघून जातात. बोगस कथा सांगून कोट्यावधी रुपये लुबाडतात. स्पृशास्पृश्यता पाळतात. तिथे मात्र इंदुरीकरांना ट्रोल करणारे गप्प असतात. त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या जातात. आलिशान व्यवस्था केली जाते. गोरगरिबांच्या खिशातून काढलेले कोट्यावधी रुपये त्यांच्या घशात घातले जातात आणि इथं इंदुरीकरांना शिव्या दिल्या जातात व्वारे महाराष्ट्र.
इंदुरीकरांनी लोकांना सत्याच्या मार्गावर नेलं. कोणाची फसवणूक, दिशाभूल केली नाही. सत्याच्या आवाजात नैसर्गिक मोठेपणा असतो. ताकद असते. गोंगाट करून तो दाबता येत नाही. आरडाओरडा करून सत्य सांगणाऱ्याला थांबवता येत नाही. सत्य सूर्यप्रकाशासारखं असतं. ते झाकता येत नाही. ते अज्ञान, अंधःकार आणि असत्याचा भांडाफोड करत राहतं. कोणाला भीत नाही आणि भीकही घालत नाही. इंदुरीकरांची आजपर्यंतची वाटचाल एकंदर अशीच सुरू आहे.
इंदुरीकरांच्या अभ्यासाविषयी, साधनेविषयी, ज्ञानाविषयी, त्यागाविषयी फारसं कोणी बोलत नाही. चॅनलवरून कधी चर्चा होत नाही. त्यांची रात्रंदिवस चालणारी धावपळ, प्रवासाची दगदग, वेळेवर झोप नाही, वेळेवर जेवण नाही, कुटुंबाला पत्नी मुलाबाळांना वेळ नाही, कुटुंबासोबत सण उत्सव नाही, मौजमजा नाही की कुटुंबाला घेऊन पर्यटन नाही. त्यांचा हा त्याग, त्यांचे कष्ट टीकाकारांना दिसत नाहीत. दिसतो तो फक्त पैसा. ते पैसा कमावतात तोही जाहीरपणे आणि इतरांनाही कमवायला सांगतात. मुला मुलींना शिक्षण घ्या, संस्कारी बना, मोठ्या पदापर्यंत पोहोचा, उद्योग व्यवसाय करा, आई-वडिलांचे स्वप्न साकार करा, पैसा कमवा, मोठे व्हा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका असाच संदेश ते त्यांच्या कीर्तनातून देतात. तरुण वर्गाला कीर्तनाकडे आकर्षित करण्यात इंदुरीकर यांचे योगदान अनमोल आहे ही ही मान्य केलं पाहिजे. अगदी कीर्तनाच्या गादीवरून तरूणांना मटण विका आणि पैसे कमवा असे सांगणारे ते एकमेव कीर्तनकार असावेत. अंत्यविधी, रक्षाविसर्जन, दशक्रिया विधी यामधील चुकीच्या गोष्टी विरोधात कीर्तनातून परखड भूमिका मांडणारेही ते एकमेवच. हे सगळं बोलायला करायला वाघाचं काळीज लागतं ते कोणाचंही काम नाही. *तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।*
इथं परिपूर्ण, शंभर टक्के दोषविरहित असं कोणीच नाही. *बोले तैसा चाले* हे आज तरी फारसं कोणालाच लागू पडत नाही हे मान्य करायला हवं. पण कथनी आणि करणीमध्ये कमीत कमी अंतर असावे अशी जर समाजाची अपेक्षा असेल तर त्यातही काही चुकीचं नाही हे ही लक्षात घेतलं पाहिजे. आज कीर्तन करणारी मंडळी कोणीच संत नाहीत हे उघड सत्य आहे. संतांच्या अभंग रचनांवर निरूपण करणारे सगळेच व्यावसायिक कीर्तनकार आहेत हे आता सर्व मान्य झाले आहे. इंदुरीकर त्यापैकीच एक आहेत. एकतीस वर्षांपासून गाव, शहर, वाडी, वस्ती, अगदी माळरानावर जातात ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा आदी वारकरी संतांच्या विचारांची भगवी पताका डोलाने फडकवतात. साधे राहतात, साध्या माणसांमध्ये मिसळतात, गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या घरची चटणी भाजी भाकरी आनंदाने खातात. सप्ताहाच्या पंगतीमध्ये बसून प्रसाद घेतात. कसलाही डामडौल नाही, मानपान नाही, आलिशान सोयी सुविधांच्या अपेक्षा नाही. वारकरी जीवन जगणारे हे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचं आणि महाराष्ट्राचं भूषण आहे.
प्रबोधन ही कालही समाजाची गरज होती आजही आहे आणि उद्याही असेल. वारकरी संप्रदायात असं काही घडलं की *कीर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही* या म्हणीची अनेक जण वारंवार पुनर्पेरणी करताना दिसतात. पण त्यात तथ्य नाही. समाजावर चांगले संस्कार करत राहणे गरजेचे असते. याचा अर्थ कीर्तनाने सगळाच समाज सुधारेल, समाजातले सगळेच दोष नाहीसे होतील असेही नाही पण समाजात चांगुलपणा रुजवण्यासाठी, टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. हजारो वर्षांपासून शेती केली जाते, दरवर्षी तण काढले जाते पण तण संपत नाही म्हणून काय शेती करायची सोडून दिली जात नाही. तसं प्रबोधनही सोडता येणार नाही. समाजातील दोषांची काढणी आणि गुणांची पेरणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संतांच्या आणि महापुरुषांच्या प्रबोधनाच्या चळवळीने हा महाराष्ट्र महाराष्ट्र बनवला हे कोणालाच नाकारता येणार नाही.
इंदुरीकरांनी कीर्तन सोडू नये. महाराष्ट्राला त्यांच्या प्रबोधनाची गरज आहे. तरुण पिढीला, समाजाला तारण्याची ताकद त्यांच्या कीर्तनात आहे. इंदुरीकरांनी सुरू केलेला प्रबोधनाचा लढा प्रभावी आणि परिणामकारक ठरला आहे. महाराष्ट्रात सलग तीस एकतीस वर्ष लोकप्रियता टिकून ठेवणारा दुसरा कीर्तनकार नाही. पण महाराष्ट्रात मोठ्या माणसांवर टीका होते, त्यांना विरोध होतो हा इतिहास आहे आणि तेच वर्तमान आहे. मोठ्या माणसांवर टीका करणे हा मोठं होण्याचा साधा सोपा मार्ग आहे. क्षेत्र कुठलेही असो राजकारण, समाजकारण वारकरी संप्रदाय असो वा आणखी कुठले असो ज्या झाडाला गोड फळं लागतात त्याच झाडावर लोकं दगडं मारतात. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या *महाराष्ट्रात चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर आधी मरावं लागतं.* हयात असताना जे लोक ज्ञानदेव, नामदेव, तुकोबादी संतांना चांगलं म्हणाले नाहीत. त्रास दिला, विरोध केला तिथे इंदुरीकर यांचे काय ?
हा लेख प्रपंच म्हणजे इंदुरीकरांची बाजु सावरण्याचा प्रयत्न मुळीच नाही कारण ते एवढे छोटे नाहीत आणि त्यांची बाजु सावरावी एवढा मी मोठा नाही. कोट्यावधी लोक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे बाकी काहीही असो पण सत्याची परखडपणे मांडणी करणारे इंदुरीकर कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राला हवे आहेत. आणि इंदुरीकर एकच दुसरे होणे नाही हे ते आहेत तोपर्यंत लोकांच्या लक्षात आले आणि लोकांनी त्यांचे त्यांच्या हयातीत कौतुक केले तर बरे होईल.



