बीड

पंडित-पवारांची युती फक्त चार दिवसांसाठी, मी दोघांनाही जवळून पाहिले आहे – विलास सुतार

पंडित-पवारांची युती फक्त चार दिवसांसाठी,
मी दोघांनाही जवळून पाहिले आहे – विलास सुतार
गेवराई शहराच्या विकासासाठी फक्त शिवछत्र परिवाराच सक्षम

गेवराई, दि.२८ (प्रतिनिधी) ः- गेवराई नगर पालिका निवडणुकी पुरतीच पंडित-पवारांची युती आहे, मी या दोघांचा स्वभाव जवळून पाहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्मण पवार घराच्या बाहेर पडले नाहीत त्यामुळे तुमचा पराभव कोणामुळे झाला हे आता सांगायची गरज नाही. आजच्या परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारा फक्त शिवछत्र परिवार आहे, त्यामुळे गेवराईकरांनी गेवराई शहराच्या सर्वांगिन विकासासाठी माजी आ. अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांच्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विलास सुतार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात विलास सुतार पुढे म्हणाले की, पंडित मुक्तीचा नारा देणारे शेवटी पंडितांच्याच मांडीलामांडी लावून बसले असल्याचे आपण पाहत असून दोघेही पहिल्यापासून एकच होते. एकाने रडल्यागत तर दुसऱ्याने हाणल्यागत करायचे असे या दोघांचे चालू आहे. कदाचित पंकजाताई विसरल्या असतील की लोकसभेला त्यांचा पराभव किती मताने व कोणामुळे झाला ? लक्ष्मण पवार लोकसभेला कुठे होते व त्यांनी काय केले ? हे संपुर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे. पंडित-पवारांची झालेली युती फक्त चार दिवसांची आहे, नगर परिषद झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्यात जागा वाटपावरून वाद होऊ शकतो. कारण मी या दोघांनाही जवळून पाहिले आहे, त्यामुळे गेवराईकरांनी त्यांच्या भुलथापांना बळी न पडता शिवछत्र परिवारावर विश्वास ठेवावा.

बीड जिल्ह्यात शिवछत्र हा एकमेव परिवार असा आहे की तो दिलेला शब्द पाळतो, महेश दाभाडे हे सर्वसामान्य घरातील असून एक हक्काचा माणूस म्हणून अमरसिंह पंडित यांनी त्यांना उमेदवारी दिली. परंतु विरोधकांनी मात्र घराणेशाहीला पाठबळ दिले. हा प्रचार विकासाच्या मुद्यावर व्हायला हवा पण तो दुसरीकडेच भरकटत आहे. गेवराई शहराचा विकास करण्यासाठी अमरसिंह पंडित यांच्या हातात नगर परिषदेचे सुत्र देणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित काम करत असून गेवराई नगर परिषद जर शिवछत्र परिवाराच्या ताब्यात दिली तर गेवराई शहर हे दुसरी बारामती होईल हे कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे गेवराई शहरातील मतदारांनी सौ. शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विलास सुतार यांनी केले.

Back to top button