बीड
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक ॲड वसंतराव साळुंके सलग पाचव्यांदा विजयी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक
ॲड वसंतराव साळुंके सलग पाचव्यांदा विजयी
_ सलग पाचव्यांदा विजयी होण्याचा विक्रम
बीड, दि.७: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य निवडणूकीत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ॲड वसंतराव दिगंबररराव साळुंके यांनी सलग पाचव्यांदा विजयी होण्याचा विक्रम नोंदविला आहे. परिषदेच्या ६५ वर्षांच्या इतिहासातसलग पाच वेळा विजयी होणारे परिषदेचे ते पहिले आणि एकमेव सदस्य आहेत.
महाराष्ट्र गोवा विधी परिषदेच्या २५ जागांसाठी २४ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.सहा) घोषित करण्यात आला. २५ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत एकूण ९२ हजार ५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील ८८ हजार ३५७ मते वैध तर ३ हजार ६९४ मते अवैध ठरली. यातून ॲड वसंतराव साळुंके यांना पहिल्या पसंतीची एक हजार ८१२ मते पडली. ४ जून रोजी पहिल्या पसंतीच्या मतांची यादी घोषित झाली. तर अंतिम निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यामध्ये त्यांना पसंती क्रमानुसार मिळालेल्या अंतिम मतांचे मूल्य ३ लाख ६९ हजार ३३० आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड वसंतराव दिगंबररराव साळुंके हे १९८२ पासून म्हणजेच स्थापनेपासून कार्यरत आहेत. तर बार कौन्सिलवर १९९८ पासून सलग निवडून येत आहेत. २०२२_२३ या वर्षात परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले ॲड वसंतराव साळुंके हे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील रहिवासी आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव साळुंके माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तर ॲड मयूर वसंतराव साळुंके व ॲड सुदर्शन जीवनराव साळुंके हे त्यांचा वारसा नेटाने पुढे नेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दूडशेहून अधिक विधीज्ञ तयार झाले आहेत. जिल्हा न्यायाधीश तसेच जेएमएफसी, विधी अधिकारी या पदावरही अनेक जेण पोहचले आहेत. सदस्य पदी निवडून आल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
*लॉयर्स अकॅडमीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न*
शेतकरी, कष्टकरी, वंचित व बहुजन समाजातील विधीज्ञांच्या पाठबळामुळेच आपण पाचव्यांदा निवडून आलो आहोत. अगोदरच्या काळात ई कोर्ट व ई लायब्ररी सक्षम करण्यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. तर आगामी काळात महाराष्ट्र -गोवा विधी परिषदेच्या वतीने तळोजा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स अकॅडमी व ट्रेनिंग सेंटरचे अधिक सक्षमीकरण व्हावे, चांगले विधीज्ञ येथुन घडावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया ॲड वसंतराव साळुंके यांनी निवडून आल्यानंतर व्यक्त केली.



