बीड
११ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; पाच दिवसांचे बँकिंग लागू करण्याची मागणी, जिल्ह्यात बँकिंग सेवा ठप्प

११ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; पाच दिवसांचे बँकिंग लागू करण्याची मागणी, जिल्ह्यात बँकिंग सेवा ठप्प
बीड | प्रतिनिधी
आठवड्यातून पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) राष्ट्रीय आवाहनानुसार ११ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यासह देशभरातील बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक देशव्यापी संप पुकारला. या संपामुळे बीड, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, केज यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बँकांचे नियमित कामकाज आणि ग्राहक सेवा ठप्प झाली. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांच्या शाखांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होत केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांदरम्यान झालेल्या १२ व्या द्विपक्षीय करारात आठवड्यातील सर्व शनिवार सुट्टी जाहीर करून सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करण्याबाबत सहमती झाली होती. मात्र, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही मागणी तातडीने मंजूर करून देशभरात पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली.
बीडमध्ये आंदोलनादरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यासह विविध बँकांमधील २०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ‘पाच दिवसांचे बँकिंग तात्काळ लागू करा’, ‘बँक कर्मचारी-अधिकारी एकजुटीचा विजय असो’ आणि ‘यूएफबीयू जिंदाबाद’ अशा घोषणांनी बँक परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नियोजन व नेतृत्व कॉम्रेड जयेश भोसले, कॉम्रेड विपिन गिरी, कॉम्रेड विनोद मुळेकर आणि कॉम्रेड अनंत वालेकर यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत संपामागील भूमिका स्पष्ट केली. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यूएफबीयूच्या प्रमुख मागण्यांमध्ये आठवड्यातील सर्व शनिवार सुट्टी घोषित करून पाच दिवसांचे बँकिंग त्वरित लागू करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच पीएलआय योजना रद्द करणे, जुन्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे अद्ययावतीकरण करणे तसेच एनपीएसधारक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. आगामी काळात २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्याचा तसेच २६ ऑक्टोबरपासून देशभरात बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



