बीड

आदित्य डेंटल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा दिन उत्साहात

आदित्य डेंटल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा दिन उत्साहात

दंत आरोग्याविषयी जनजागृती करत समाजात आनंदी व निरामय जीवन जगण्याचा संदेश; विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
प्रतिनिधी | बीड
समाजात मुख आणि दंत आरोग्याविषयी व्यापक जागरूकता निर्माण करून सर्वांनी आनंदी,निरामय आणि सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे, याच उद्देशाला समोर ठेवून बीड येथील आदित्य डेंटल कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयात दिवसभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अदिती सारडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. हिमांशू श्रीवास्तव, क्लिनिकल इन्चार्ज डॉ. समीरा कुरेशी आणि सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाचे प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सहभाग वाढविण्यासाठी दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये तोंडाचे आरोग्य तपासणी शिबिर, विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा, दंत आरोग्याविषयी जनजागृती मोहीम असे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमामुळे आम्हाला नवीन व्यावहारिक ज्ञान मिळाले असून आमचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. डॉ. मंगेश अंधारे यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. हिमांशू श्रीवास्तव, क्लिनिकल इन्चार्ज डॉ. समीरा कुरेशी, डॉ. अभिजीत मोहखेडकर, डॉ. हरि कुमार मेम्पल्ली , डॉ. अमित हांडा, डॉ. निखत, डॉ. मंगेश अंधारे, डॉ. प्रांजल लिंबगावकर, डॉ. मयूर आवचार, डॉ. सुजाता सतोसकर, डॉ. सुमैया, डॉ. मोनिका, डॉ. दीप्ती, डॉ. फरहाना, डॉ. तेजस्विनी जायभाय, डॉ. वैभवी पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आदित्य डेंटल कॉलेजच्या प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा- डॉ. आदिती सारडा
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची, ज्ञान वाढवण्याची आणि आत्मविश्वास विकसित करण्याची संधी मिळते. प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक आयुष्यात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावे असे आवाहन डॉ. अदिती सारडा यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करताना केले.
Back to top button