बीड
भूमाफियांच्या मुजोरीमुळे श्रीवर्धनचा गळा आवळला; ५ एकर खाडी क्षेत्रातील खारफुटीचा सामूहिक बळी!

भूमाफियांच्या मुजोरीमुळे श्रीवर्धनचा गळा आवळला; ५ एकर खाडी क्षेत्रातील खारफुटीचा सामूहिक बळी!
पहिल्याच पावसात अख्खे शहर जलमय;
संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल
श्रीवर्धन (संदेश घोलप) :
शहरातील कुंभारवाडा, मच्छी मार्केट आणि जुन्या बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या अतिसंवेदनशील खाडी क्षेत्रातील अंदाजे ५ ते ६ एकर क्षेत्रातील नैसर्गिक कांदळवनांची (खारफुटी) भूमाफियांनी बेकायदेशीरपणे कत्तल केली आहे. या अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर माती आणि दगडांचा बेकायदेशीर भराव टाकण्यात आला असून, या जागेवर भविष्यात टोलेजंग आलिशान निवासी संकुले आणि व्यापारी गाळे उभारण्याचा डाव असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
कांदळवनांची कत्तल करून टाकण्यात आलेल्या या अजस्त्र भरावामुळे खाडीकडे जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मुख्य मार्गच बदलल्यामुळे, या वर्षीच्या पहिल्याच मुसळधार पावसात श्रीवर्धन शहर पूर्णपणे जलमय झाले. शहरातील रोहिदास नगर, वाणी आळी, दादर पूल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि टिळक रस्ता या भागांत प्रचंड प्रमाणात पूरसदृश पाणी साचले. हे पाणी थेट नागरिकांच्या घरांत आणि दुकानांत शिरले
विशेष म्हणजे, यापूर्वी २४ मे २०२२ रोजीही याच भागातील खारफुटी तोडीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यावेळी प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई करून हात झटकले. प्रशासनाच्या याच मवाळ भूमिकेमुळे भूमाफियांचे धाडस वाढले असून आज संपूर्ण शहर बुडण्यापर्यंत त्यांची मुजोरी पोहोचली आहे.
प्रशासनाचा नाकर्तेपणा; नागरिक आक्रमक
एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिवसढवळ्या वृक्षतोड आणि भरावाचे काम सुरू असताना संबंधित महसूल विभाग, वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग काय करत होते? शासकीय यंत्रणा झोपेत होती की याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली गेली? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मूक संमतीशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊच शकत नाही, असा उघड आरोप आता नागरिक करू लागले आहेत.
गंभीर पर्यावरणीय धोका
खारफुटी ही किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षण करणारी वनसंपदा मानली जाते. समुद्राच्या भरती-ओहोटीचा प्रभाव कमी करणे, किनारी धूप रोखणे, जैवविविधतेचे रक्षण करणे आणि चक्रीवादळांना थोपवणे ही महत्त्वाची कामे ही कांदळवने नैसर्गिकरीत्या करत असतात. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, हा बेकायदेशीर भराव वेळीच उपसून न हटवल्यास भविष्यात समुद्राच्या भरतीचे पाणी थेट मुख्य शहरात घुसेल आणि श्रीवर्धनला कधीही न भरून निघणाऱ्या मोठ्या पर्यावरणीय आपत्तीला सामोरे जावे लागेल.
उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी गुन्ह्यांची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आता संपूर्ण तालुक्यातून जोर धरू लागली आहे. पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या भूमाफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि हा बेकायदेशीर भराव तात्काळ हटवून नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, हे शोधण्यासाठी आता नागरिकांनी माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी देखील सुरू केली आहे.



