📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

“ग्रामस्थांनी मराठी शाळा समृद्ध कराव्यात”-वारकरीभूषण कैलास म.भोरे यांचे आवाहन

“ग्रामस्थांनी मराठी शाळा समृद्ध कराव्यात”-वारकरीभूषण कैलास म.भोरे यांचे आवाहन

बांधखडक येथे लोकसहभागातून साकारले भव्य ‘भोजनकक्ष’

जामखेड: ‘माझा म-हाटाची बोलू कवतिके!परि अमृतातेही पैजा जिंके!’ असे गौरवोद्गार ज्या मराठी भाषेबद्दल विश्वमाऊली संत ज्ञानेश्वरांनी काढले, त्या मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यासाठी गावागावांत असणारी विद्यामंदिरे अर्थात मराठी शाळा टिकविणे ही काळाची गरज बनली आहे.यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाळा समृद्ध कराव्यात असे आवाहन वारकरीभूषण वैराग्यमूर्ती ह.भ.प.कैलास म.भोरे यांनी बांधखडक येथे केले.ते लोकसहभागातून साकारलेले शालेय ‘भोजनकक्ष’ तसेच ज्येष्ठ उद्योगपती विश्वनाथ लोणकर यांनी प्रदान केलेले सुमारे ७५ हजार रूपयांचे ‘क्रीडा साहित्य’ यांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक आंधळे तसेच नायगाव, खर्डा,तेलंगशी व सोनेगाव या केंद्रांचे केंद्रप्रमुख केशव गायकवाड उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी अशोक आंधळे यांनी बांधखडक येथे ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या शैक्षणिक क्रांतीचे पंचायत समिती शिक्षण विभाग जामखेडच्या वतीने विशेष कौतुक करत या शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हे राज्याला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.

चौकट
पुणे येथील मयुरेश्वर ट्रॅव्हल्स कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथ लोणकर यांनी डबल स्विंग,मेरी गो राऊंड,सी-साॅ, घसरगुंडी, चप्पल स्टॅण्ड, प्रतिमापूजन स्टॅण्ड, पोडियम,कचरा कुंड्या इ.क्रीडा व विविध शालोपयोगी साहित्य प्रदान केल्याबद्दल तसेच गावचे भूमीपुत्र गोरख वारे यांनी शाळेला तब्बल ९गुंठे जागा प्रदान केल्याबद्दल या दोन्ही दानशूर व्यक्तिमत्त्वांचा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी नायगाव केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधखडक, वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या तीनही शाळांतील विद्यार्थ्यांना बांधखडकचे माजी सरपंच केशव वनवे यांच्या सौजन्याने प्राप्त झालेली प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. विविध गुणदर्शन स्पर्धेत तालुकास्तरावर गाजलेल्या दत्तवाडी (धोंडपारगाव) शाळेतील स्वानंदी सुशीलकुमार धुमाळ व बांधखडक शाळेतील प्रतिष्ठा अमोल वारे या इ.२रीच्या विद्यार्थीनींनी अनुक्रमे ‘आदिशक्ती मुक्ताबाई ‘ व ‘मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र’ या ऐतिहासिक महापुरुषांचे वेशभूषेसह सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली,तर पिंपळगाव आळवा शाळेचे उपाध्यापक विठ्ठल पवार यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बांधखडक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य ,आजी-माजी विद्यार्थी तसेच बांधखडक, वनवेवस्ती व चव्हाणवस्ती शाळांतील पालक व शिक्षकवृंद यांच्यासह स्थानिक महिला व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रस्तावना व सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यापक नितीन घालमे यांनी केले आणि सुधीर उगले या पालकांतर्फे कार्यक्रमानंतर सर्वांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

Back to top button