बीड
चऱ्हाटा गावचा सुपुत्र किसन उबाळे याची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

चऱ्हाटा गावचा सुपुत्र किसन उबाळे याची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी
संघर्षातून उभी केलेली यशाची कहाणी
◾ श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
बीड : सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर चऱ्हाटा गावच्या किसन अनिल उबाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर झेप घेतली आहे. वयाच्या ३३व्या वर्षी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ११ सप्टेंबर १९९२ रोजी जन्मलेल्या किसन यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. आई सुनिता उबाळे यांच्या कष्टातून आणि आजोबा रामराव मस्के, आजी आसराबाई मस्के तसेच मामा श्रावण मस्के यांच्या सहकार्याने त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. बीड तालुक्यातील पालवन येथे त्यांनी पहिलीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण रेणुका विद्यालयात घेतले. त्यानंतर के. एस. के. महाविद्यालय, बीड येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. २१ जुलै २०१४ रोजी राज्य राखीव पोलीस दल, संभाजीनगर येथे नोकरीची सुरुवात करत त्यांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू ठेवला. नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. २०२१ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत केवळ दोन गुणांनी अपयश आले, मात्र त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी सुरू ठेवली. २०२३ च्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा परीक्षेत त्यांनी आपली खरी क्षमता सिद्ध केली. प्राथमिक परीक्षेत ४८ गुण मिळवत उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षेत ३०० पैकी तब्बल २६५ गुण मिळवले, तर शारीरिक चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवत एकूण ४०० पैकी ३६५ गुणांची भक्कम कामगिरी करून जवळजवळ ६५० उमेदवारात १११ वा क्रमांक पटकावला. नुकतीच निवड झालेल्या उमेदवारांची शासनाने यादी प्रकाशित केली आहे. या यशाने त्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले. किसन यांच्या यशामागे आईचे कष्ट, कुटुंबाचे पाठबळ आणि स्वतःची जिद्द हे महत्त्वाचे घटक ठरले. वडिलांचे छत्र लवकर हरपले असतानाही त्यांनी हार न मानता संघर्ष सुरू ठेवला. त्याची बहिणीही वन विभागात कार्यरत असून कुटुंबाने नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिले.चऱ्हाटा गाव हे आधीपासूनच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी ओळखले जाते. किसन उबाळे यांच्या यशाने या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.“अपयश आले तरी थांबू नका, सातत्य ठेवा आणि मेहनत करा,” असा संदेश किसन उबाळे यांनी तरुणांना दिला आहे. त्यांच्या या यशोगाथेने संघर्षातून यश मिळवण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
प्रतिक्रिया:
“यश मिळेपर्यंत थांबायचे नाही. आपण निवडलेल्या क्षेत्रात मोठे व्हायचे, हा ठाम निर्धार केलेला होता. प्रवासात त्रास होतो, अपयश येते, पण त्या अडचणींना घाबरून मागे हटायचे नाही हे मनात पक्के होते. सातत्याने योग्य ती मेहनत करत राहिलो, तर यश नक्की मिळते हा माझा विश्वास आहे. भविष्यात सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी नक्की काम करणार.”
◾किसन उबाळे, निवड झालेले पोलिस उपनिरीक्षक



