घरगणना व जनगणना शासन कशी करणार?ॲड.डॉ.अरुण जाधव

घरगणना व जनगणना शासन कशी करणार?ॲड.डॉ.अरुण जाधव
भटके-विमुक्त घरगणना यात्रेला खर्डा येथून प्रारंभ
जामखेड प्रतिनिधी : महाराष्ट्रातील भटके विमुक्त आदिवासी सतत भटकत आहेत, त्यांची घर गणना आणि जनगणना शासन कशी करणार? असा ठाम सवाल भटके विमुक्त नेते ॲड.डाॅ. यांनी केला.
आज दिनांक ५ जून २०२६ रोजी तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या पावन भूमीतून त्यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्तांच्या हक्कांची ‘घरगणना’ व ‘जनगणना’ करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागीय मुशाफिरी यात्रा उत्साहात सुरू झाली.
या यात्रेचा ऐतिहासिक प्रारंभ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथून करण्यात आला.या यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नकाशावर नसलेल्या, हक्कांपासून वंचित राहिलेल्या प्रत्येक भटके-विमुक्त बांधवांची अचूक नोंद करणे, त्यांच्या हक्काचे घर आणि जनगणना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.
चला, या न्याय्य हक्कांच्या लढ्याला साथ देऊया आणि ही मुशाफिरी यात्रा यशस्वी करूया! असे आवाहनही यावेळी करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या ४२ भटके-विमुक्त घटकांची स्वतंत्र घरगणना व जनगणना व्हावी, तसेच या प्रश्नाकडे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
दि. ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत ही यात्रा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांतून मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा राज्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये पोहोचणार आहे.या यात्रेदरम्यान भटके-विमुक्त आदिवासींच्या पालांवर जाऊन घरगणना व जनगणना या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, संचालक बापूसाहेब ओहोळ, दत्तराज पवार, सुनील साळुंके, आदिवासी नेते विशाल पवार तसेच सलीम मदारी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी मंगल शिंगाणे, उर्मिला कवडे, सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, जीवन परमार, पांडुरंग शिंगाणे, फकीर मदारी, वैशाली पवार, ललिता पवार, आशाबाई काळे, लता काळे, उषा पवार, शारदा पवार, मुस्तफा मदारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार निता इंगळे यांनी मानले.



