बीड

आ. प्रकाशदादा सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सन्मान करावा – माधव शेंडगे

आ. प्रकाशदादा सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सन्मान करावा – माधव शेंडगे

वडवणी (प्रतिनिधी):माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार मा. श्री. प्रकाशदादा सोळंके यांना जनतेने सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. ही निवड जनतेचा त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास, त्यांचे कार्यकौशल्य व दीर्घकालीन सामाजिक-राजकीय योगदानाची पावती असल्याचे मत वडवणी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव शेंडगे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, सिंचन तसेच रोजगारनिर्मिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने ठोस भूमिका घेतली आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच सक्रिय प्रयत्न केले असून पक्षसंघटन मजबूत करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे.

माजलगाव मतदारसंघ हा ग्रामीण व अर्धग्रामीण स्वरूपाचा असल्याने येथील समस्यांची जाण असलेले अनुभवी नेतृत्व राज्य मंत्रिमंडळात असणे अत्यंत गरजेचे आहे. आमदार प्रकाशदादा सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेमध्ये आहे.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच माजलगाव मतदारसंघ व मराठवाड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमदार प्रकाशदादा सोळंके यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देऊन सन्मानित करावे, अशी ठाम मागणी माधव शेंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Back to top button