बीड
भाजी-फळ विक्रेत्यांवर मर्दुमकी गाजवणारे नगरपरिषद प्रशासन भुमाफियांसमोर नपुसंक ! विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली :- डॉ.गणेश ढवळे

भाजी-फळ विक्रेत्यांवर मर्दुमकी गाजवणारे नगरपरिषद प्रशासन भुमाफियांसमोर नपुसंक ! विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली :- डॉ.गणेश ढवळे
बीड (दि.२०) : बीड शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत मर्दुमकी गाजवणारे नगरपरिषद प्रशासन बिंदुसरा नदीपात्रातील मोठ्या अतिक्रमणांबाबत भुमाफियांसमोर नपुसंक असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे.
डॉ. ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विभागीय आयुक्तांनी दोन वेळा आदेश देऊनही बिंदुसरा नदीपात्रात भराव टाकून नदीचा प्रवाह वळवणे, ओढे बुजवणे तसेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे हातावर पोट भरणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांवर नगरपरिषद प्रशासन मर्दानगी दाखवत असल्याची टीका त्यांनी केली.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून काही ठिकाणी कचरा टाकून भराव घालणे, प्लॉटिंग करणे, रस्ते तयार करणे आणि बांधकामे उभारणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.
या संदर्भात डॉ. गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त गट-अ, नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील डॉ. निलम पाटील यांनी २९ मे २०२३ व २८ जून २०२३ रोजी मुख्याधिकारी, नगरपालिका बीड यांना संबंधित अतिक्रमणांवर ठोस कारवाईचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“पुर आल्यास जबाबदार कोण?”
१९८९ मध्ये बिंदुसरा नदीला आलेल्या पुराचा अनुभव लक्षात घेता नदीकाठच्या पुर नियंत्रण रेषा (निळी रेषा व लाल रेषा) निश्चित करणे आवश्यक असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे. नगरपरिषद, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाला वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
नदीपात्रातील वाढते अतिक्रमण आणि प्रवाहात होत असलेला बदल यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊन जिवित व वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं. ८१८०९२७५७२



