बीड

श्रीवर्धन आगार नवीन गाड्यांच्या प्रतीक्षेत; प्रवाशांचे हाल वाढले

श्रीवर्धन आगार नवीन गाड्यांच्या प्रतीक्षेत; प्रवाशांचे हाल वाढले
भंगार अवस्थेतील एसटी बसमुळे प्रवास धोक्यात, राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन (संदेश घोलप):
श्रीवर्धन एसटी आगाराची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून भंगार अवस्थेतील बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. अनेक वर्षांपासून नवीन बसगाड्या न मिळाल्याने आगारातील बहुतांश बस जुनाट, वारंवार बिघडणाऱ्या आणि प्रवासासाठी असुरक्षित ठरत आहेत. परिणामी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
श्रीवर्धन आगारातून मुंबई, नालासोपारा,रोहा, माणगाव, महाड, आदी मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. मात्र बसांची खराब स्थिती, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. काही बस रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागत आहे. याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेषतः बसत आहे.
आगारातील अनेक बसांचे आयुष्य संपले असूनही त्या तात्पुरत्या दुरुस्त्या करून रस्त्यावर चालवल्या जात आहेत. बसमधील आसने तुटलेली, खिडक्या खराब, पावसाळ्यात गळती, तसेच ब्रेक आणि इंजिनसंबंधी तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून बीएस-६ प्रकारच्या आधुनिक बसगाड्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनेक महिने उलटूनही श्रीवर्धन आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही. त्यामुळे “आश्वासनाचा विसर पडला की काय?” असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
दरम्यान, बीएस-६ बसमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आसने, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल चार्जिंग पॉईंट, डिजिटल डिस्प्ले, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने अशा बस श्रीवर्धन आगारात तातडीने देण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
नवीन बसगाड्या लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास प्रवाशांचा एसटीवरील विश्वास डळमळीत होईल आणि खासगी वाहतुकीकडे ओढ वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन श्रीवर्धन आगाराला तातडीने नवीन बसगाड्या मंजूर कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Back to top button