बीड
श्रीवर्धनकरांच्या नशिबी २४ कोटींचा ‘जलाभिषेक कि चहाभिषेक’? कोट्यवधींच्या पाणी योजनेचे पितळ उघडे!

श्रीवर्धनकरांच्या नशिबी २४ कोटींचा ‘जलाभिषेक कि चहाभिषेक’? कोट्यवधींच्या पाणी योजनेचे पितळ उघडे!
रानवली धरण ते श्रीवर्धन मार्गावर दर दुसऱ्या दिवशी पाईपलाईन फुटतेय; ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली बिलांचा मलिदा लाटणारा ‘तो’ कंत्राटदार कोण? जनतेचा संतप्त सवाल.
श्रीवर्धन (संदेश घोलप) भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासकीय अनास्थेमुळे श्रीवर्धनकरांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भीषण ‘पाणीबाणी’चा सामना करावा लागत आहे. २४ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प सध्या श्रीवर्धनच्या नागरिकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात, जाहिरातीबाजी आणि आणाभाका घेत या योजनेचे उद्घाटन झाले खरे, पण अवघ्या काही दिवसांतच या योजनेचा फुगा फुटला असून संपूर्ण शहरात पाईपलाईन फुटून अक्षरशः पाण्याचा अपव्यय सुरू आहे.
दर दुसऱ्या दिवशी ‘पाणीबाणी चा खेळ!
रानवली धरण ते श्रीवर्धन या मुख्य जलवाहिनीवर दर दुसऱ्या दिवशी कुठे ना कुठे पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरू आहे. पाईपलाईन फुटली की, प्रशासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली तातडीने रस्ते खोदले जातात, पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित केला जातो आणि नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत राहतात. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या वारंवार होणाऱ्या ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली नवीन बिलांचे आकडे फुगवून जनतेच्या पैशांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप आता नागरिक करत आहेत.
हे ५ सवाल प्रशासनाला जाब विचारणारे!
श्रीवर्धनमधील या विदारक परिस्थितीमुळे आता जनतेमधून थेट आणि आक्रमक सवाल उपस्थित केले जात आहेत:
तो ‘लाडका’ कंत्राटदार कोण? ज्या कंत्राटदाराने हे संपूर्ण काम केले, त्याचे काम पूर्ण आणि समाधानकारक झाल्याचा ‘प्रमाणपत्र’ देणारा तो महाभाग अधिकारी कोण?
गुणवत्ता तपासली होती की डोळे मिटले होते? कोट्यवधींच्या कामाची गुणवत्ता तपासणारी कोणतीही यंत्रणा सक्रिय होती का, की केवळ कागदोपत्री घोडे नाचवले गेले?
वॉरंटीचा पत्ता कुठे आहे? इतक्या मोठ्या प्रकल्पाची काही वॉरंटी किंवा गॅरंटी होती की नाही? की कंत्राटदाराला मोकळे रान देण्यासाठीच हा अट्टाहास होता?
मेंटेनन्सचा करार कोणासोबत? जर योजना नवीन आहे, तर दर दुसऱ्या दिवशी दुरुस्तीसाठी नवीन बिलं कोणाच्या खिशात जात आहेत?
नेत्यांचे फोटो आणि बिलांचे आकडे एवढेच खरे होते का? केवळ उद्घाटनाचे सोहळे रंगवून आणि चमकोगिरी करून जनतेला तहानलेले ठेवण्याचा हा डाव आहे का?
…तर नळातून पाऐवजी थेट ‘चहाच’ येईल!
”आज श्रीवर्धनमध्ये परिस्थिती इतकी खालावली आहे की, नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार नसून नशिबाचा भाग वाटू लागला आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचा चिखल इतका उघडपणे दिसत आहे की, आता पावसाळा सुरू झाल्यावर नळातून स्वच्छ पाण्याऐवजी थेट ‘चहा’ यायला लागला, तरी आश्चर्य वाटायला नको!” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.
पावसाळ्यापूर्वी आंदोलनाचा इशारा!
एकीकडे कोट्यवधींचे आकडे हवेत फिरत असताना दुसरीकडे मात्र श्रीवर्धनकरांचे घसे कोरडे आहेत. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या पाणीबाणीवर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढला नाही आणि संबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त श्रीवर्धनकरांनी दिला आहे. आता तरी कुंभकर्णी झोपेतून प्रशासन जागे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


