चौंडीच्या पूरग्रस्तांसाठी स्वयंदीप फाउंडेशनचा मानवतेचा हात

चौंडीच्या पूरग्रस्तांसाठी स्वयंदीप फाउंडेशनचा मानवतेचा हात
२५० किराणा किट, २५० विद्यार्थ्यांना साहित्य, २५० महिलांना साडीवाटप असे मदत किटचे वाटप .
जामखेड। प्रतिनिधी
जामखेड – तालुक्यातील चोंडी येथे स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी पूरग्रस्त कुटुंबे व शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत किट वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमांतर्गत २५० किराणा किट, २५० शालेय साहित्य संच तसेच २५० महिलांसाठी साड्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभा वानखडे म्हणाल्या की, समाजातील गरजू घटकांना आधार देणे हीच संस्थेची प्रमुख भूमिका असून, आपत्तीच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
यावेळी सुनंदा गायकवाड यांनी सांगितले की, संकटाच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणे आवश्यक असून, या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. समाजाच्या सहकार्याने असे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतात, असे त्यांनी नमूद केले.
तर डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षण, समता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व गरजू कुटुंबांसाठी मदत किट देणे हा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रम पूर परिस्थितीनंतर तत्काळ घेण्याचे नियोजन होते; परंतु दिवाळी सण, त्यानंतर सुट्ट्या, काही तांत्रिक अडचणी आणि शासकीय आचारसंहितेच्या कारणास्तव उशिरा पार पडला. शेवटी २५ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या घेण्यात आला.
सदर कार्यक्रम घेण्यासाठी परिश्रम घेतलेले या गावचे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे, प्रा. डॉ. संस्कृती सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे बौद्ध समाजामध्ये गरजू कुटुंबांना मदत मिळाली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या नीलम सोनवणे आणि माजी सरपंच अभिमान सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी घेण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमास सचिन कुरणे, प्रतिभा वानखडे, डॉ. बाळासाहेब सोनवणे, सुनंदा गायकवाड, नंदाताई भालेराव, तनिष्का भालेराव, सागर मिसाळ, वर्षा चवरे, फाल्गुनी सोनवणे, ऋषी सोनवणे, कमल कांबळे, श्रीराम कांबळे व अरुंधती ढसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक करण्यात आले असून,
सरपंच मालन अविनाश शिंदे ग्राम विकास अधिकारी,ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वयंदीप सोशल फाउंडेशन प्रति आभार व्यक्त करण्यात आले.



