बहुजननायक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार समाजाला दिशादर्शक – रमेश पोकळे

बहुजननायक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार समाजाला दिशादर्शक – रमेश पोकळे
बीड दि. 11 (प्रतिनिधी) –समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजननायक, थोर समाजसुधारक आणि महामानव महात्मा जोतिराव फुले यांनी कार्य केले. त्यांच्या विचारांनी सदैव समाजाला योग्य दिशा दिली असून, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.
येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात बीड आणि संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्था सचिव प्रा गणेश पोकळे, प्रा. बप्पासाहेब हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे पोकळे म्हणाले की, महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील वंचित घटकांना उभारी दिली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी महात्मा फुले यांचा विचार उद्धृत करत सांगितले की, “सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल; पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका.” हा संदेश प्रत्येकाने जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रा. सुहास गाढवे, प्रा.अफरोज सय्यद, प्रा. महेश नेवडे, दिपक जाधव, संध्या खोसे,शंकर इंगोले, सचिव चौरे व विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.



