बीड

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
लाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी
अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील नागरिक तथा शेतकरी प्रतिनिधी प्रमोदकुमार ताराचंद छाजेड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेलद्वारे निवेदन देत धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलाव दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच गोळेगाव येथील तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने शेतकरी बांधवांचे जीवन पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर व चांगला झाल्यास खरीप पिकातूनच शेतकऱ्यांची गुजराण होत असते. मात्र पाणीटंचाईमुळे दरवर्षी शेती आणि जनजीवनावर परिणाम होत आहे.
धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच भिंतींमधून होणारा पाझर थांबविण्याची कामे झाल्यास परिसरातील विहिरींना अधिक काळ पाणी उपलब्ध राहू शकते. त्यामुळे शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच गोळेगाव येथील सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तलावाच्या दोन्ही बाजूंना डोंगररांग असल्याने पाणी साठवण क्षमता वाढविण्यास मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने या तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर केल्यास आसपासच्या १५ ते २० गावांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा पाणी व विकासाच्या बाबतीत दीर्घकाळ उपेक्षित राहिल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रमोदकुमार छाजेड यांनी केली आहे.
Back to top button