तुलसी इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

निसर्गाच्या सान्निध्यात खेळत – शिकत विद्यार्थ्यांचा आनंदी दिवस
बीड (प्रतिनिधी) – देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीड येथील नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी जिरेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीविषयी माहिती घेतली. पिकांचे प्रकार, भाजीपाल्याची लागवड, पाणी देण्याच्या पद्धती आणि शेतीतील दैनंदिन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतात फिरतांना मुलांनी नैसर्गिक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला.
सहलीदरम्यान मुलांसाठी हुरडा पार्टी, खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे मुलांचा दिवस खूप आनंदात गेला.
या सहलीचे नियोजन शाळेच्या प्राचार्या सौ.उमा जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाने मनापासून परिश्रम घेतले.



