बीड
संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह बांधकामासाठी निधीसह मंजूरी

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह बांधकामासाठी निधीसह मंजूरी
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वतंत्र, हक्काचे वसतीगृह होणार
आ.संदिप क्षीरसागर यांनी मानले स्व.अजितदादा पवार आणि महाराष्ट्र शासनाचे आभार
बीड दि.12 (प्रतिनिधी) : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह होणार हा निर्णय संपुर्ण बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक झाला आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतीगृहाच्या बांधकामासाठी शासनाकडून भरघोस निधीसह मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आ.संदिप क्षीरसागर यांनी दिवंगत नेते स्व.अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.
मागील मोठ्या कालावधीपासून बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने बीड जिल्ह्यातील स्थलांतरीत ऊसतोड कामगारांची मोठी संख्या लक्षात घेवून त्यांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि हक्काचे शासकीय वसतीगृह उभारण्यात यावे या करीता आ.संदिप क्षीरसागरांचा पाठपुरावा सुरू होता. संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना प्रभावीपणे राबवून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी. या करीता दुरदृष्टी असलेले दिवंगत नेते स्व.अजितदादा पवार यांनी सकारात्मक भुमीका घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली होती. तसेच, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही या कामास मंजुरी देऊन मोठा निर्णय घेतला. बुधवार (दि.11) रोजी शासन निर्णयाव्दारे बीड जिल्ह्यातील 11 वसतीगृह बांधकामाच्या कामास शासनस्तरावरून तब्बल 159.36 कोटी रूपयांच्या भरघोस निधीसह मंजुरी देण्यात आली. त्यात बीड मतदारसंघासाठी बीड शहरात संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह बांधकामाकरीता 14 कोटी 56 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. हा निर्णय केवळ वसतीगृह उभारणीपुरता मर्यादित नसून तो ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या उज्वल भविष्यसाठी घेतलेला ऐतिहासिक टप्पा आहे. गरीब, कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि सुरक्षित निवासाची सुविधा मिळणार हि माझ्यासाठी खरी समाधानाची बाब असल्याचे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी स्व.अजित दादा पवार व महाराष्ट्र शासनाचे आभार मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.


