बीड

बीडमध्ये रंगतोय बालनाट्याचा उत्सव  मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे झाले उदघाटन

बीडमध्ये रंगतोय बालनाट्याचा उत्सव
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे झाले उदघाटन
बीड/ प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ ची प्राथमिक फेरी आजपासून बीड येथे उत्साहात सुरू झाली आहे. ही स्पर्धा दि. ११ ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन दिपाताई क्षीरसागर, द्वारकदास फटाले, सतीश विटकर, संजय पाटील देवळावकर, सुनील डोंगरे, प्रविण वडमारे, सुरेश बारसे, तन्मय पाटसकर आणि अंजना पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बालकलावंतांचा उत्साह आणि रसिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील दहा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.बीड केंद्रावर तीन दिवसांत जिल्ह्यातील विविध बालनाट्य संस्था, शाळा व विद्यालयांमधील एकूण १५ बालनाट्य प्रयोग सादर होणार आहेत. दररोज पाच ते सहा प्रयोग होणार असून गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा रंगभूमीची परंपरा जोपासत आहे.सदर स्पर्धेचा प्रवेश पूर्णपणे मोफत असून, बीड जिल्ह्यातील बालकलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच बालनाट्याचा दर्जेदार आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.बीड केंद्रातील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वय समितीत तन्मय शेटगार, दिनेश पाटोळे, प्रविण राठोड, अक्षय कोकाटे, परमेश्वर पडुळे, ऋषिकेश दाभाडे आणि राहुल राऊत यांचा समावेश आहे.बीडमध्ये सुरू झालेल्या या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बालकलावंतांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले असून, रंगभूमीच्या संस्कारांची जोपासना अधिक बळकट होणार आहे.
Back to top button