बीड

शिवसेनेत धूसफुस:शाखा उद्घाटन की गटबाजीचा मंच? तालुकाप्रमुखांना डावलून शाखा उद्घाटन?

शिवसेनेत धूसफुस:शाखा उद्घाटन की गटबाजीचा मंच? तालुकाप्रमुखांना डावलून शाखा उद्घाटन?

जिल्हा नेतृत्वाने हस्तक्षेप करावा; शिवसैनिकांतून सूर

जामखेड प्रतिनिधी :

तालुक्यातील नान्नज व जवळा येथे नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना पक्षाच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने हे उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा प्रकार केवळ गैरहजेरीचा नसून, तालुकाप्रमुखांना जाणीवपूर्वक टाळूनच तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेमुळे शिवसेना पक्षात अंतर्गत धूसफूस सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जामखेड तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर शिवसेनेला कडवे आव्हान उभे असताना, प्रा. माने यांनी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शाखा उद्घाटनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग न दिसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रा. माने यांनी जामखेड शहरासह तालुक्यात शिवसेना वाढीसाठी मोठे योगदान दिले असून नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षा पदासाठी त्यांनी अनेक दिवसांपासून तयारी केली होती. मात्र ऐनवेळी तालुकाप्रमुखांचे तिकीट कट करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाजूला ठेवून पॅनल तयार करण्यात आला. परिणामी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर जाऊन संपूर्ण पॅनलचा पराभव झाला.
नगरपरिषदेचा निकाल २४-१ असा लागला असताना, शिवसेनेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्या शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. माने यांच्या पत्नी वर्षाताई माने.
आगामी काळात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुखांसह सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी चर्चा सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

Back to top button