बीड
संविधानिक मूल्यांचा सन्मान ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी” – सुदामतीताई वाघ

संविधानिक मूल्यांचा सन्मान ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी” – सुदामतीताई वाघ
शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बीड, दि. २६ (प्रतिनिधी): भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची आठवण करून देणारा राष्ट्रीय संकल्पाचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव मिळाली आहे. या संविधानिक मूल्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे मत शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती सुदामतीताई वाघ यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नामदेव वाघ, गणेश कदम, रंजित कदम, प्रवीण तोडकर, चंद्रसेन शेंडगे, दिलीप कदम, दादाराव काळे, श्रद्धा कॉम्प्युटरचे संचालक काळे, दिलीप जोगदंड, शैलेश जोगदंड, शालिनी जोगदंड, दत्तात्रय चव्हाण, आत्माराम वाव्हळ सर आदी मान्यवर उपस्थित होते.
बीड शहरालगत असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थेचे संस्थापक सचिव स्व. गोविंदराव वाघ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी चि. शिवराज तोडकर व कु. श्रेया कदम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर आपले विचार मांडले. त्यानंतर दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी चि. तानाजी सुभाष काळे याने राष्ट्रीय रायफल/पिस्तोल शूटिंग स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तानाजीने २५ मीटर स्टँडर्ड पिस्तोल (सीनियर गट) मध्ये तृतीय क्रमांक (कास्यपदक) तसेच २५ मीटर स्पोर्ट पिस्तोल (ज्युनियर गट) मध्ये द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावले असून त्याची आंतरराष्ट्रीय इंडियन टीम ट्रायल्ससाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याचप्रसंगी बीड शहरातील एमआयडीसी परिसरातील श्रद्धा कॉम्प्युटर यांच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आकाश अंगद मोरे, द्वितीय क्रमांक वैष्णवी अमोल शेंडगे तर तृतीय क्रमांक अमृता बाबू पाखरे यांनी पटकावला. मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विजेत्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देण्यात आली. यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई येथील अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत असलेले शैलेश जोगदंड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती सुदामतीताई वाघ म्हणाल्या की, भारतीय
प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची आठवण करून देणारा राष्ट्रीय संकल्पाचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव मिळाली आहे. या संविधानिक मूल्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणातूनच सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी पिढी घडू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून देशासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करावा. लोकशाहीची ताकद ही संविधानात आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गानेच पुढे गेले पाहिजे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी राष्ट्र अधिक मजबूत करण्याचा निर्धार करावा असे आवाहन शेवटी श्रीमती सुदामती वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आत्माराम वाव्हळ सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती फाटे, श्रीमती साळुंके, श्रीमती सानप, श्री गुजर सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी नागरिक, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



