सद्भावना, शांतता व ऐक्याचा संदेश देणारी ‘सद्भावना सायकल यात्रा’ बीडमध्ये उत्साहात

सद्भावना, शांतता व ऐक्याचा संदेश देणारी ‘सद्भावना सायकल यात्रा’ बीडमध्ये उत्साहात
बीड | प्रतिनिधी:-समाजात शांतता, एकता, सौहार्द व सद्भावना यांचा प्रभावी संदेश देण्यासाठी स्नेहालय – युवा निर्माण प्रकल्प यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या पुढाकाराने आयोजित सद्भावना सायकल यात्रा (२०२५–२६) बीड शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, रोटरी क्लब ऑफ वडगाव गुप्ता आणि रोटरी क्लब ऑफ केडगाव टाऊन यांचा संयुक्त सहभाग लाभला. हा उपक्रम रोटरी जिल्हा ३१३२ अंतर्गत राबविण्यात आला.
ही सद्भावना सायकल यात्रा नांदेड येथून प्रारंभ होऊन अहिल्यानगर येथे समारोप होणारी असून विविध वयोगटांतील ४८ सायकलस्वार या यात्रेत सहभागी झाले होते. युवकांमध्ये सकारात्मक विचारांची जोपासना करणे, शाश्वत व आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणे तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
या सद्भावना सायकल यात्रेमध्ये रोटरी सायकलिंग क्लब तसेच योगा प्रतिष्ठान यांचे सायकलस्वारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सायकलस्वारांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला.
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी बीड शहरातील माँ वैष्णो पॅलेस येथे या यात्रेचे नियोजनबद्ध व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी माँ वैष्णो पॅलेस येथून शिवाजी विद्यालय, बीड येथे समारोप होणारी सद्भावना जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली बीड शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाली. रॅलीमध्ये अग्रभागी सायकलस्वार, त्यानंतर दुचाकीस्वार आणि शेवटी चारचाकी वाहने अशी रचना होती.
या जनजागृती रॅलीचा शुभारंभ बीड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिन पांडकर यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय मा. श्री. संतोष सानप, माँ वैष्णो पॅलेसचे मा. श्री. संतोष सोहनी, स्नेहालयाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, अॅड. श्याम असावा, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष इंजि. राहुल बोरा, सचिव प्रो. डॉ. प्रकाश कोंका, प्रोजेक्ट चेअरमन रो. गणेश वाघ तसेच रोटरी क्लबचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
रॅलीच्या समारोपप्रसंगी शिवाजी विद्यालय, बीड येथे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र वाघमारे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना “सद्भावनेची शपथ” देण्यात आली. या शपथेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. रॅलीपूर्वी सर्व सहभागींसाठी नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित व शिस्तबद्धरीत्या पार पडला.
सद्भावना सायकल यात्रा (२०२५–२६) हा उपक्रम समाजात ऐक्य, सेवाभाव व शांततेचा संदेश देणारा ठरला. विविध रोटरी क्लब्स, रोटरी सायकलिंग क्लब, योगा प्रतिष्ठान यांच्यातील समन्वय, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासकीय सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी नमूद केले.



