बीड
माता व बाल संगोपन रुग्णालयाला फर्निचर, सिलिंग व ऑक्सिजन पाईपलाईन आदी कामांसाठी पावणेदोन कोटींचा निधी मंजूर पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश – डॉ. गणेश ढवळे

माता व बाल संगोपन रुग्णालयाला फर्निचर, सिलिंग व ऑक्सिजन पाईपलाईन आदी कामांसाठी पावणेदोन कोटींचा निधी मंजूर
पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश – डॉ. गणेश ढवळे
बीड :– (दि.०७) बीड जिल्हा रुग्णालय परिसरात २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेले १०० खाटांचे माता व बाल संगोपन रुग्णालय तब्बल २१ कोटी खर्चून २०२३ मध्ये पूर्ण झाले. मात्र गेली दोन वर्षे निधीअभावी लिफ्ट ,फर्निचर, सिलिंग आणि ऑक्सिजन पाईपलाईनची कामे रखडली असल्याने ही इमारत धुळखात पडून होती.
सदर प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २ वर्षांपासून सतत निवेदने, आंदोलनाद्वारे हा विषय सातत्याने पुढे आणला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांना निवेदन देत, “निधी तातडीने उपलब्ध न झाल्यास ‘पालकमंत्री अजितदादा के नाम पे देदे बाबा’ लक्ष्यवेधी भिक मागो आंदोलन केले जाईल,” असा इशारा देण्यात आला होता.
या पाठपुराव्यानंतर अखेर जिल्हा नियोजन समितीकडून खालीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला—
फर्निचर : ₹९८ लाख ५ हजार
सिलिंग काम : ₹४९ लाख ५ हजार
ऑक्सिजन प्लांट ते इमारत पाईपलाईन : ₹२५ लाख
एकूण – ₹१ कोटी ७३ लाख (पावणे २ कोटी रुपये)
—
पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार – डॉ. ढवळे
बीड जिल्हा रुग्णालयाची सध्याची क्षमता ३२० खाटांची आहे, तर प्रत्यक्षात रुग्णसंख्या ४५० च्या घरात असते. प्रसूती व प्रसूती-पश्चात विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने गर्भवती महिलांना अनेकदा खाट उपलब्ध होत नाही. या परिस्थितीत १०० खाटांच्या स्वतंत्र माता-बाल रुग्णालयामुळे महिलांना आणि बालकांना स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज उपचारसुविधा मिळणार आहेत.
फर्निचर व सिलिंग कामांसाठी पावणे दोन कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार असल्याचे डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे.



