पंकजाताई, बालाघाटाच्या डोंगररांगा वाचवा! पर्यावरणप्रेमींचे साकडे; महसूल व पोलिस प्रशासनाच्या मदतीने गौण खनिज माफियांचा धुमाकूळ– डॉ. गणेश ढवळे

पर्यावरणप्रेमींचे साकडे; महसूल व पोलिस प्रशासनाच्या मदतीने गौण खनिज माफियांचा धुमाकूळ– डॉ. गणेश ढवळे
बीड :– (दि. २)पर्यावरणातील डोंगररांगा, पठारे, टेकड्या यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेले हे सौंदर्य आता अस्तित्वाच्या संकटात सापडले आहे. भौतिक विकासकामांच्या नावाखाली रस्ते, औद्योगिक वसाहती, ग्रामविकास यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम, दगड, गोटे, माती अशा गौण खनिजांचा वापर होत असून, त्यामुळे निसर्गाची साक्ष देणाऱ्या डोंगररांगांचे अवैधरित्या फोडकाम सुरू आहे.
शासनाचे ‘बोटचेपे’ धोरण आणि महसूल व पोलिस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भू-माफियांशी हातमिळवणी यामुळे या अवैध कृत्यांना अधिकच चालना मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य बालाघाटाच्या डोंगररांगा महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संगनमताने चालणाऱ्या गौण खनिज माफियांच्या तावडीत सापडल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी यांनी वारंवार तक्रारी करून आंदोलने केली असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक कारवाई टाळत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीत महसूल व पोलिस विभागातील काही अधिकारी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या वाहनांचा सहभाग असल्याची चर्चा जनतेमध्ये खुलेआम होत आहे.
या उत्खननामुळे जिल्ह्यातील जंगलं, झाडं, डोंगररांगा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भूजलपातळी झपाट्याने घटत आहे, मातीची धूप वाढली असून भविष्यात बीड जिल्हा ओसाड होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी गंभीर चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख – बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरणमंत्री पंकजा ताई मुंडे यांना लेखी निवेदन देऊन बालाघाटाच्या डोंगररांगा वाचविण्याचे साकडे घातले आहे.
—



