आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रा – नगरसेवक बिभिषण धनवडे यांचा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी –
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांच्यावतीने यंदाही जामखेड शहरातील माता-भगिनींसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनवडे यांनी केले.
नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे सलग २४ वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील महिलांना पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर दर्शनासाठी नेले जाते. यावर्षी बुधवार, दि. २९ सप्टेंबर रोजी आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला जाणार आहे. टेकाळे वस्तीजवळील धनवडे यांच्या निवासस्थानापासून सकाळी ९ वाजता गाड्या सुटणार असून यात्रेतील महिलांसाठी गडावर फराळीचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.
धार्मिक परंपरेचा वारसा जपत आणि सामाजिक बांधिलकी जोपासताना हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माता-भगिनींच्या संपर्कात राहून सतत या यात्रेचे आयोजन करून नगरसेवक धनवडे यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. लवकरच टेकाळे वस्ति येथील जगदंबा देवीच्या मंदिराचे काम पूर्ण करून मूर्ती स्थापना व कलश पूजनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांनी दिली.



