बीड
जागतिक आरोग्य संस्थेच्या शिष्टमंडळाची बीड जिल्हा हिवताप कार्यालयाला भेट; कामगिरीचे कौतुक

जागतिक आरोग्य संस्थेच्या शिष्टमंडळाची बीड जिल्हा हिवताप कार्यालयाला भेट; कामगिरीचे कौतुक
बीड (प्रतिनिधी):जागतिक आरोग्य संस्था (WHO) यांच्या शिष्टमंडळाने आज बीड जिल्हा हिवताप कार्यालयाला विशेष भेट दिली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी श्री. विजयसिंह शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना शाबासकीची थाप देण्यात आली.
सद्याच्या पावसाळी परिस्थितीतही बीड जिल्ह्यात हिवतापाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या कीटकजन्य रोगांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत WHO शिष्टमंडळाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला.
या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील विविध आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय बीड येथे पाहणी केली. तसेच, अंबाजोगाई येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयालाही भेट देण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यातील कीटकजन्य आजारांवरील नियंत्रणाबाबतचा आढावा घेत असताना WHO शिष्टमंडळाने जिल्हा हिवताप कार्यालयाच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
या सर्व यशस्वी कामकाजामागे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था कार्यरत आहे.
या भेटीदरम्यान श्री. विजयसिंह शिंदे यांनी WHO च्या अधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमास जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीद्वारे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर एक सकारात्मक शिक्कामोर्तब झाले आहे.


