बीड
मांजरा धारण तुडुंब भरले; आ. नमिता मुंदडांनी केले जलपूजन

मांजरा धारण तुडुंब भरले; आ. नमिता मुंदडांनी केले जलपूजन
धरण भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला : आ. नमिता मुंदडा
अंबाजोगाई : धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने केज मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून अनेक गावांचा पाणीपुरवठा आणि सिचानाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी सकाळी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी धरणस्थळी भेट देऊन जलपूजन केले.
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, पन्नगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा, सुनील गलांडे, संजय गंभीरे, भगवान केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धरण परिसरात बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धरण लवकर भरले असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. धरण भरल्याने सिंचन व पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे. दरवर्षी धरण भरावे यासाठी वरुणराजाकडे प्रार्थना केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी धरणाचे अभियंता यांच्याशी संवाद साधला. सध्याच्या घडीला धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन करताच यासंदर्भातील सर्व सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्याचेही आ. मुंदडा यांनी सांगितले.



