जामखेड येथे साध्वी परमपूज्य चारुप्रज्ञाजी व जयाप्रज्ञाजी महाराज साहेबांचे भव्य स्वागत

जामखेड येथे साध्वी परमपूज्य चारुप्रज्ञाजी व जयाप्रज्ञाजी महाराज साहेबांचे भव्य स्वागत
जैन श्रावक संघाच्या वतीने भव्य स्वागत सोहळा संपन्न
जामखेड | प्रतिनिधी:-वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने जामखेड शहरात आज सकाळी साध्वी परमपूज्य चारुप्रज्ञाजी महाराज साहेब आणि साध्वी परमपूज्य जयाप्रज्ञाजी महाराज साहेब यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सकाळी ८ वाजता शहरातून निघालेल्या भव्य स्वागत रॅलीने उत्साहाचे व भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले.
नगर रोड, खर्डा चौक, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे रॅली काढण्यात आली. रॅलीचे समारोप जैन स्थानक येथे करण्यात आले. रॅली दरम्यान शहरात शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे शहर पवित्रमय झाले.
कार्यक्रमाप्रसंगी साध्वीजींनी आपल्या प्रवचनात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, येत्या १० जुलै २०२५ पासून जामखेड येथे चार महिन्यांचा चातुर्मास सोहळा सुरू होणार आहे. या कालावधीत दररोज प्रवचने, ध्यानसत्रे आणि विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, जैन समाजासाठी हे अध्यात्मिक पर्व असणार आहे.
या सोहळ्याला जैन समाजातील श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. चातुर्मासाच्या निमित्ताने शहरात आध्यात्मिक उर्जा आणि भक्तिभाव जागृत झाला आहे.



