खाजगी संस्थांच्या दावणीला बांधलेल्या जिल्हा प्रशासनामुळे नांदुरघाटची जि.प. शाळा वाचवण्यासाठी अमोल जाधववर आत्मदहनाचा इशारा देण्याची वेळ यावी हि लाजिरवाणी बाब :- डॉ.गणेश ढवळे

—
बीड:- ( दि.११ ) एकीकडे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहीलीपासुन विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे त्यामुळे गावच्या मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे न जाता गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घ्यावे यासाठी 25% पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट शासनाने दिले असून त्यासाठी आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.जिल्हापरीषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी
शिक्षकांनी जुनच्या पहिल्या आठवड्यापासून कामाला लागण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मात्र याचवेळी केज तालुक्यातील नांदुरघाट येथील जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अमोल सखाराम जाधव यांनी शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन सहकार्य न करता खाजगी संस्था चालकांचे हित जोपासत अडथळे निर्माण करत असल्याने दि.१४ जुन रोजी शाळेच्या प्रांगणात आत्मदहनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अमोल जाधव यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्यांना आत्मदहनापासुन परावृत्त करण्यात यावे हि शासन आणि प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे म्हणत मुख्यमंत्री, पालकमंत्री बीड, शिक्षणमंत्री, विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदरघाट जिल्हा परिषद शाळेसाठी नांदुरघाट ग्रामस्थांचे कौतुकास्पद उपक्रम
—
नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी नांदुरघाट ग्रामस्थांचा लढा गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असुन जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी, नळपट्टी आदी ग्रामपंचायतने करमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.तसेच शाळेत सीसीटीव्ही, शैक्षणिक साहित्य आणि पटसंख्या भरपूर असुन विद्यार्थ्यांना उत्तेजन देणारे उपक्रम राबविण्यात येत असुन गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये सर्वांगीण विकासासाठी नांदुरघाट ग्रामसथ मोलाचे योगदान देत आहेत.
एकीकडे पटसंख्या वाढवणा-या शाळांचा गौरव आणि दुसरीकडे नांदुरघाट सारख्या शाळा बंद पाडणार..हा शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाचा दुटप्पीपणा :- डॉ.गणेश ढवळे
—-
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी जनजागृती करावी,पालकांशी संपर्क करावा, सर्वेक्षण, अंगणवाडी,गृहभेटीतुन जनजागृतीचे उपक्रम राबवुन पटसंख्या किमान १५ ते २५ टक्के जास्त वाढविण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.सर्वात जास्त पटनोंदणी केलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे आणि दुसरीकडे नांदुरघाट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील ग्रामस्थांची अडवणूक केली जात असुन असा दुजाभाव का?? त्यासाठी अमोल जाधव अध्यक्ष शालेय शिक्षण समिती यांच्यावर आत्मदहनाची वेळ यावी हा ढोंगीपणा नाही का?? असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे



