बळीराजाच्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी सहदेव होनाळे यांची खांद्यावर नांगर घेऊन विधानभवनाकडे पायी दिंडी ; लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे

बळीराजाच्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी सहदेव होनाळे यांची खांद्यावर नांगर घेऊन विधानभवनाकडे पायी दिंडी ; लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.०७) गेल्या आठवड्यात डोक्यावर कर्जाचा बोजा, कोळपणीसाठी पैसे नसल्याने स्वतःच्या खांद्यावर जोखड घेऊन शेती कसण्याची वेळ हडोळतीच्या ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांच्यावर ओढावली. त्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत व्हायरल आणि विविध दैनिकात फोटोसह बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि राज्य सरकारने त्यांना ४० हजाराची मदत देऊन दखल घेतली. जर सरकार खांद्यावर नांगर घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच दखल घेत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जोखड घेऊनच शेती करायची का ? असा सवाल करत लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील सहदेव होनाळे हे शेतकरी दि.०४ शुक्रवार पासुन खांद्यावर नांगर घेऊन पायी मुंबईच्या विधानभवनाकडे निघाले आहेत. काल दि.६ रविवार रोजी लिंबागणेश येथे मुक्कामी होते. आज सकाळी सोमवार रोजी लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी यश मिळो असा शुभेच्छा देत पाठिंबा दिला.यावेळी डॉ.गणेश ढवळे, राम फाळके, हरिओम क्षीरसागर, सुनिल ढवळे ,समीर शेख, लहु घोलप, चेतन कानिटकर , नवनाथ बोराडे, अर्जुन घोलप,खंडु वाणी आदी ग्रामस्थ हजर होते.
सहदेव होनाळे पदवीधारक आहेत, कुटुंबात आई, पत्नी,भाऊ,मुलांसह एकुण १३ जण आहेत.३ भावंडात एकुण साडे ९ एकर शेती आहे.त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.सरकारकडुन कर्जमाफी दिली जात नाही.आधारभुत किंमत योजनेसाठी नोंदणी करूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जात नाही.मनरेगा अंतर्गत कामाचे पैसे मिळत नाही,एक रुपयात पिक विमा योजना सरकारने गुंडाळली आहे. मागील २-३ वर्षातील पिक विमा अजुन मिळाला नाही, सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत असुन सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी चर्चा करताना दिली.



