बीड

जलप्रदूषण रोखणे काळाची गरज – प्रोफेसर महादेव काळे

जलप्रदूषण रोखणे काळाची गरज – प्रोफेसर महादेव काळे

प्रतिनिधी / पाटोदा – मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरिक्त वापर केला. अनेक वर्षे प्रचंड प्रमाणात जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभी केली. याचा दुष्परिणाम म्हणून भूगर्भातील जलपातळी खाली गेली. सद्यस्थितीत पृथ्वीतलावर पिण्यायोग्य अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. प्रदुषित पाण्यामुळे जास्तीत जास्त रोग पसरतात हे ज्ञात असूनही स्वतःच्या स्वार्थासाठी आपण जलप्रदूषण करत आहोत. सजीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी जलसंवर्धन करून जलप्रदूषण रोखणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रोफेसर महादेव काळे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभागांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, उपप्राचार्य प्रोफेसर सतिश माउलगे, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे, भूगोल विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चौधरी होते.

प्रास्ताविकात डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी जागतिक जल दिनाचे महत्व स्पष्ट केले.

प्राचार्यांच्या वतीने अध्यक्षीय समारोपात प्रा. अनिल जोगदंड म्हणाले की, शेतीमध्ये पाण्याचा अधिक गैरवापर होत आहे. शेतीत पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आपण घराबाहेर व्यवस्था करणे गरजेचे आहे.

यानंतर सामुहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. लक्ष्मण गाडेकर यांनी केले.

Back to top button