खर्डा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; नदीपात्रात अतिक्रमण

खर्डा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; नदीपात्रात अतिक्रमण
जामखेड प्रतिनिधी:-खर्डा बस स्थानकासमोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जुन्या काळातील शासकीय गोदाम पाडून त्यावरील पत्रे व लोखंडी साहित्य भंगार मध्ये विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी खर्डा येथील शिवाजी भोसले, रघुनाथ खेडकर, दत्तात्रय भोसले,अनिल राऊत, संभाजी भोसले उमेश गुरसाळी, नसीरभाई बागवान, आकाश खेडकर आदी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया अहिल्यानगर यांच्याकडे दिनांक 21 मार्च रोजी समक्ष भेटून व निवेदन देऊन केली आहे.
खर्ड्यातील जुने शासकीय गोदामाच्या इमारतीवरील पत्रे, काढून भंगार विक्री केली आहे, नंतर इमारत पाडण्यात आली या प्रकरणात श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर आणि त्यांचा मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांचा या इमारती पाडण्यामध्ये सहभाग आहे. सदरची इमारत आमच्या समक्ष 18 मार्च रोजी जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करण्यात आली आहे. सदरची इमारत पाडत असताना येथील शेजारील गाळे धारकांनी विचारणा केली असता सदर महिला व तिच्या मुलाने दहशत माजविण्याचा प्रयत्न करून खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. तसेच खर्डा – जामखेड रोड पुलालगत नदीपात्रामध्ये जुन्या घिसाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवरती नदीपात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गोदामाचे साहित्य व पडझड तसेच नदीपात्रातील अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले आहे, हा सर्व प्रकार श्रीमती ज्योती गोलेकर व त्यांचा मुलगा संग्राम गोलेकर यांनी उभा राहून त्या ठिकाणी आमचे समक्ष केला आहे.तसेच शासकीय गोडाऊन पडझड करणे कामी जेसीबी मालक सुमित चावणे व चालक तुकाराम सुरवसे यांनी पाडण्यास मदत केली आहे, तरी आम्हा सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की,जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून या सर्व लोकांवरती लवकरच कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अन्यथा या प्रकरणाची दखल न घेतल्यास आम्ही गाळेधारक व ग्रामस्थ 27 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय जामखेड येथे आमरण उपोषणास बसणार असून त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर सुरज कोठावळे,शरद थोरात, लक्ष्मी खेडकर, रुक्मिणी भोसले, वैशाली थोरात, सुनिता भोसले,वर्षा खेडकर, सुनिता कोठावळे, रत्नमाला भोसले, सुन्नमी बागवान, स्वाती राऊत आदींच्या सह्या होत्या.
निवेदनाचे प्रती तहसील कार्यालय जामखेड, पुरवठा विभाग जामखेड, पोलीस स्टेशन जामखेड, पोलीस स्टेशन खर्डा, ग्रामपंचायत कार्यालय खर्डा इत्यादींना देण्यात आल्या आहेत.



