संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांना थकीत अनुदानाचे त्वरीत वाटप करा आ. नमिता मुंदडा यांची मागणी

आ. नमिता मुंदडा यांची मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, या तिन्ही योजनेतील लाभार्थ्यांना मागील सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसून सदरील मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करावे अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या संदर्भात ना. संजय शिरसाट यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, या तीन योजनेअंतर्गत निराधार, वयोवृद्ध नागरिकांना मानधन दिले जाते. परंतु शासनाने थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली लागू केल्याने व सदर प्रणालीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सदर मानधन मागील सहा महिन्यापासून रखडले असल्याने वृद्ध, निराधार तहसील कार्यालयाच्या चकरा मरून त्रस्त असून त्यांच्यामधून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
वरील तिन्ही योजनेचे लाभार्थी हे वयोवृद्ध, निराधार आहेत सदर योजनेतून मिळणाऱ्या मानधनातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो परंतु मागील सहा महिन्यापासून त्यांना मानधन न मिळाल्याने सदर लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या खाण्यापिण्यासह औषधींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली त्वरित सुरळीत करून वरील योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित मानधन त्यांना तातडीने अदा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली त्वरित सुरळीत करून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, या तिन्ही योजनेतील लाभार्थी यांना प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याबाबत आदेश व्हावेत अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सदरील निवेदनात केली आहे.



