तुलसी शैक्षणिक समूहाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या बहारदार कलाविष्कारांनी प्रेक्षक, पालकांची मने जिकंली

बीड दि.२४ – तुलसी शैक्षणिक समूहातील तुलसी कॉम्पुटर सायन्स अँड आयटी कॉलेज, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, माता रमाई व तुलसी नर्सिंग कॉलेजचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दि.२२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कलाविष्कारांनी प्रेक्षक आणि पालकांची मने जिंकली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीचे उपआयुक्त मा.रविंद्र जोगदंड होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.प्रदीप रोडे होते. विचार मंचावर तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्ष मा.दिपाताई रोडे, सौ.के.एस.के.महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख मा.प्रो.दीपक जमदाडे, प्रो.डॉ.संजय कांबळे, मा.इंजि.दिपंकर रोडे यांसह प्राचार्य प्रा.डी.जी. निकाळजे, प्राचार्य डॉ.अशोक दुलदुले, प्राचार्य प्रा.मिलिंद वाडमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली यावेळी प्राचार्य प्रा.डी.जी. निकाळजे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचा वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
यावेळी मा.रविंद्र जोगदंड मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. वर्षभर ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते, ती संधी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रूपाने येते. महाविद्यालयाचा काळ हा आपल्या भविष्यातील जडणघडणीचा पाया असतो. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेणे आवश्यक आहे. रात्रंदिवस एक करून आपल्या करिअरसाठी योगदान दिल्यास, निश्चितच आपले भविष्य उज्ज्वल होईल. आजच्या पिढीला मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, याचे भान असणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणांत मा.प्रा.प्रदीप रोडे यांनी,’तुलसी शैक्षणिक समूहाने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे, मला विश्वास आहे की, या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी केवळ प्राध्यापक किंवा प्राचार्यच नाहीत, तर मोठे उद्योजक, कलाकार, वैज्ञानिक, लेखक, समाजसेवक, खेळाडू किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने संस्थेचे नाव मोठे करतील. आणि संस्थेच्या विकासात मोलाची भर घालतील, असे सांगितले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कलात्मकतेचे प्रदर्शन झाले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहवर्धक आणि आनंददायी ठरला. पालकांनीही त्यांच्या मुलांच्या प्रदर्शनाचा आनंद घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती पवार, आदित्य ठोंबरे व तनिष्का आगे यांनी केले तर आभार डॉ.योगिता लांडगे यांनी मानले. कार्यक्रमास तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



