बीड

साकत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ठोकले टाळे ; शिक्षकांना उशीर

साकत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ठोकले टाळे ; शिक्षकांना उशीर

जामखेड प्रतिनिधी) – साकत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शनिवारी (दि. २२) सकाळी ९ ऐवजी ९ वाजून ४० मिनिटांनी आले. शिक्षक उशिरा शाळेत आल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच टाळे ठोकले. मुख्याध्यापकासह इतर शिक्षक बाहेरगावाहून येतात. ते नेहमीच उशिरा येतात. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना भेटून संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र दिले आहे.
महादेव वराट, कांतीलाल वराट, गणेश वराट, राजू वराट, युवराज वराट, रमेश वराट, केशव वराट, जमशेर तांबोळी,हरिदास मुरूमकर, रमेश घोडेस्वार, शिवाजी वराट, बाळू वराट आदी ग्रामस्थ, पालक शनिवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळेत आले. तेथे एकही शिक्षक दिसला नाही. अर्धा तास शिक्षकांची वाट पाहिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. नऊ वाजून ४० मिनिटांनी तीन शिक्षक आले. इतर सहा शिक्षक आलेच नाहीत. यानंतर सर्व पालक व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शुभम जाधव यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना वारंवार तोंडी सूचना देऊन सुद्धा शिक्षक वेळेवर हजर राहत नाहीत. सतत गैरहजर राहतात. याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Back to top button