📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

एक दीप मदतीचा’ उपक्रमातून बंकटस्वामी महाविद्यालयाने वंचितांच्या जीवनात फुलविला माणुसकीचा प्रकाश!

एक दीप मदतीचा’ उपक्रमातून बंकटस्वामी महाविद्यालयाने वंचितांच्या जीवनात फुलविला माणुसकीचा प्रकाश!
बीड प्रतिनिधी :  दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण आहे. मात्र समाजातील वंचित, निराधार, अनाथ आणि गरजू घटकांच्या जीवनातही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या वतीने ‘एक दीप मदतीचा – शेतकरी व गरजूंंसाठी’ हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक योगदान देत सामाजिक उत्तरदायित्व जपले. सर्वांच्या सामूहिक सहकार्याने जमा झालेल्या निधीतून दिवाळीनिमित्त फराळ खरेदी करून विविध ठिकाणी त्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत बीड शहरातील रामनगर येथील स्नेहसावली वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथे जाऊन वृद्ध व्यक्ती आणि अनाथ मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच श्री क्षेत्र रामगड येथील आदिवासी विकास प्रकल्पामध्ये वास्तव्यास असलेल्या भटक्या, निराधार व अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या बालकांनाही दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केवळ दिवाळी साजरी करणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून समाजातील उपेक्षित घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे, त्यांच्यासोबत सणांचा आनंद वाटून घेणे आणि सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव विद्यार्थ्यांसह समाजात निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केलेले आर्थिक सहकार्य हे सामाजिक एकात्मता आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण ठरले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ. अरुण दैतकार पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश कोंका तसेच कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राजाभाऊ नागरगोजे, आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील त्रिभुवन  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button