बीड
वडगाव ढोक जिल्हा परिषद शाळेचा रस्ता बंद; विठ्ठल मंदिरात भरताहेत वर्ग!

वडगाव ढोक जिल्हा परिषद शाळेचा रस्ता बंद; विठ्ठल मंदिरात भरताहेत वर्ग!
प्रशासनाने पाहणी करून रस्ता खुला करण्याच्या सूचना देऊनही कार्यवाही नाही; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. ७) गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता दोन शेतकऱ्यांनी तारेचे कुंपण उभारून बंद केल्याने तब्बल १३० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भरवून अध्यापन करावे लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून संबंधितांना रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्यानंतरही रस्ता अद्याप खुला करण्यात आलेला नाही.
प्रशासनाच्या पाहणीनंतरही रस्ता बंदच
वडगाव ढोक येथे शिक्षकाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. प्रशस्त इमारत उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत होती. मात्र, दि. ३ ऑक्टोबर रोजी शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता दोन्ही बाजूंनी तारेचे कुंपण करून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली.
शाळेत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वर्ग भरवून अध्यापन सुरू ठेवले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी शुभम पवार आणि तहसीलदार गीतांजली गरड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि संबंधितांना शाळेकडे जाणारा रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या. मात्र प्रशासनाच्या सूचनांनंतरही रस्ता खुला करण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयातच शाळा भरवण्याचा इशारा
रस्ता खुला न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट तहसील कार्यालयात शाळा भरवण्याचा इशारा दिला आहे. सरपंच सचिन ढाकणे यांनी दि. ७ रोजी तहसील कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले.
शाळेचा रस्ता बंद असल्याने १३० विद्यार्थ्यांना मंदिरात वर्ग भरवावे लागत असतील, तर प्रशासनाच्या पाहणीनंतरही प्रत्यक्ष रस्ता खुला का झाला नाही, असा सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे : डॉ. गणेश ढवळे
वडगाव ढोक येथील जिल्हा परिषद शाळेतील १३० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाच्या सूचनांनंतरही रस्ता खुला न होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या शाळेचा रस्ता खुला करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२



