बीड

प्रा.डॉ.मयुरी राजेभोसले यांनी वित्तशास्त्रात पीएच.डी. पदवी प्रदान 

प्रा.डॉ.मयुरी राजेभोसले यांनी वित्तशास्त्रात पीएच.डी. पदवी प्रदान

जामखेड प्रतिनिधी: सेंट मीरा महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. मयुरी बाबुराव राजेभोसले यांनी वित्त (फायनान्स) विषयात पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

निवृत्त प्राध्यापक बाबुराव संभाजी राजेभोसले यांच्या कन्या मयुरी राजेभोसले यांनी ‘महाराष्ट्र राज्यात कृषी कर्जाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत खासगी क्षेत्रातील बँकांची भूमिका : पुणे जिल्ह्याच्या विशेष संदर्भात – एक विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयावर संशोधन पूर्ण केले.

या अभ्यासात त्यांनी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवाह, खासगी बँकांच्या भूमिका, शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे कर्ज आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार यांचा सखोल आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वास्तविक आकडेवारी आणि क्षेत्रीय अभ्यासावर आधारित हा संशोधन ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डॉ. मयुरी राजेभोसले म्हणाल्या, “शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना बँकिंग सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून स्थिर रोजगार निर्माण व्हावा, हाच या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. खासगी बँका या क्षेत्रात अधिक सक्रिय भूमिका बजावू शकतात, याची प्रामाणिक चाचणी या अभ्यासातून झाली.

त्यांच्या या संशोधनामुळे शेतकरी, ग्रामीण उद्योजक, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी आणि धोरणनिर्मात्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिक्षकी पेशात असतानाच केलेले हे संशोधन महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाचे उत्तम उदाहरण म्हणूनही पाहिले जात आहे.

बाप-लेकी दोघेही प्राध्यापक

वडील प्रा. बाबुराव राजेभोसले हे निवृत्त प्राध्यापक असल्याने या यशात शिक्षणकुलातील वारसा अधिक दिसून येतो. कुटुंब, सहकारी आणि विद्यार्थी यांच्यातून डॉ. मयुरी राजेभोसले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button