📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नांदूर घाट मधील मुख्यमंत्री पेजल व जलजीवन मिशन कामांच्या चौकशीसह 837 घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावर ग्रामविकास फाउंडेशन आक्रमक

नांदूर घाट मधील मुख्यमंत्री पेजल व जलजीवन मिशन कामांच्या चौकशीसह 837 घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावर ग्रामविकास फाउंडेशन आक्रमक
पेयजल योजनांची चौकशी तातडीने करा; घरकुल लाभार्थ्यांना न्याय द्या — प्रशासनाला निवेदन
नांदूर घाट. प्रतिनिधी.
 श्रीकांत

राजे जाधव.

 नांदूर घाट येथील विविध विकासकामांबाबत ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाकडे दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली असून, गावातील पाणीपुरवठा योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पेयजल योजना व जल जीवन मिशनअंतर्गत नांदूर घाट येथे झालेल्या विविध कामांबाबत ग्रामविकास फाउंडेशनने यापूर्वी प्रशासनाकडे तक्रारी व चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी २२ जुलै २०२६ रोजी जावक क्र. ११०५ अन्वये चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष चौकशी झालेली नसल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे संबंधित चौकशी समितीने नांदूर घाट येथे प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, तसेच चौकशी अहवाल ग्रामविकास फाउंडेशनला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालय, नांदूर घाट येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामविकास फाउंडेशनने दिला आहे. शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे प्रत्यक्षात योग्य प्रकारे झाली आहेत की नाहीत, निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे की नाही, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या निवेदनाद्वारे घरकुल आवास योजनेअंतर्गत नांदूर घाट येथे मंजूर झालेल्या 837 घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामसेवकांच्या अनियमित उपस्थितीमुळे मंजूर घरकुल लाभार्थ्यांबाबत आवश्यक ग्रामपंचायत ठराव व कागदपत्रे पंचायत समिती, केज येथील गटविकास अधिकारी कार्यालयात वेळेत सादर होत नसल्याने लाभार्थ्यांची पुढील प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याचे फाउंडेशनने निवेदनात म्हटले आहे.
यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ वेळेत मिळण्यात अडथळा निर्माण होत असून, अनेक गरीब व गरजू कुटुंबांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे ग्रामविकास फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले आहे.
ग्रामविकास फाउंडेशनने ग्रामसेवकांच्या गैरहजेरीची चौकशी करावी, 837 घरकुल लाभार्थ्यांचे ठराव व आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याची व्यवस्था करावी, ग्रामसेवक उपलब्ध नसल्यास पर्यायी सक्षम अधिकारी नियुक्त करावा आणि पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशा विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
“गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्ष कार्यवाही करावी. चौकशी व घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा ग्रामविकास फाउंडेशन, नांदूर घाटच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी ग्रामविकास फाउंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते
Back to top button