📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वडवणी येथे ३ एकर १३ गुंठे जमीन कागदोपत्री ‘गायब’; गौरव राठोड यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी!

वडवणी येथे ३ एकर १३ गुंठे जमीन कागदोपत्री ‘गायब’;
गौरव राठोड यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
बीड | प्रतिनिधी :
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मौजे वडवनी, गट नंबर २१४ मधील तब्बल ३ एकर १३ गुंठे जमीन कागदोपत्री गायब झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी चंद्रकांत नामदेव चाटे यांनी केला आहे. संबंधित जमीन आपल्या मालकीची असून, उपलब्ध कागदपत्रे व पुरावे असतानाही या जमिनीच्या प्रकरणावर अद्याप योग्य तो निर्णय होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने देऊनही एसडीओ व मंडळाधिकारी स्तरावरून प्रकरणाचा निर्णय टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘निर्णय देऊ नये’ म्हणून दबाव? कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा
या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून गट नंबर २१४ मधील जमिनीच्या प्रकरणावर कोणताही निर्णय देऊ नये, अशा स्वरूपाचा दबाव आणण्यात आल्याचा दावा भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांनी केला आहे.या संदर्भात संभाजीनगर विभागातील वरिष्ठ अधिकारी/आयुक्त यांच्या कथित भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राठोड यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. या रेकॉर्डिंगची सत्यता व त्यातील संभाषणाची कायदेशीर पद्धतीने तपासणी करून, या प्रकरणामागे कोणाचा हस्तक्षेप किंवा दबाव होता का, हे स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.‘मुख्य सूत्रधार कोण?’ चौकशीची मागणी
जमिनीच्या प्रकरणावर निर्णय न घेण्यासाठी जर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दबाव आणण्यात आला असेल, तर त्यामागे नेमकी व्यक्ती कोण आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.
“या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार कोण आहे? कोणाच्या सांगण्यावरून निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला? संबंधित अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता?” या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कॉल रेकॉर्डिंग, महसूल अभिलेख, फेरफार नोंदी, सातबारा उतारे, संबंधित आदेश व अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार यांची स्वतंत्र चौकशी केल्यास सत्य परिस्थिती समोर येऊ शकते, असेही राठोड यांनी सांगितले.
सात दिवसांत चौकशी समिती नेमण्याची मागणी भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांनी जिल्हाधिकारी प्रशासनाला आवाहन करताना, गट नंबर २१४ मधील ३ एकर १३ गुंठे जमिनीच्या प्रकरणाची सात दिवसांच्या आत स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.उपलब्ध सर्व महसूल अभिलेख, फेरफार नोंदी, सातबारा, आदेश, पत्रव्यवहार तसेच उपलब्ध कॉल रेकॉर्डिंगची कायदेशीर पद्धतीने तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार चंद्रकांत नामदेव चाटे यांना न्याय मिळेपर्यंत भ्रष्टाचारमुक्त पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे गौरव राठोड यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने सात दिवसांच्या मुदतीत या प्रकरणाची योग्य दखल घेतली नाही, तर संविधानिक व कायदेशीर चौकटीत आंदोलन, मोर्चा, उपोषण तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा प्रश्न जनतेसमोर मांडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, संबंधित अधिकारी व प्रशासनाची अधिकृत बाजू तसेच कॉल रेकॉर्डिंगची सत्यता स्वतंत्रपणे तपासल्यानंतरच या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button