बीड
नगर परिषदेकडून मालमत्ता नोंदींच्या प्रती देण्यास टाळाटाळ; नागरिकांची होत आहे फरफट – राकेश साळवे

नगर परिषदेकडून मालमत्ता नोंदींच्या प्रती देण्यास टाळाटाळ; नागरिकांची होत आहे फरफट – राकेश साळवे
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा गंभीर आरोप;
माहिती तातडीने न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बीड : (प्रतिनिधी) माजलगाव नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्याऐवजी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केला आहे. मालमत्ता क्रमांक 29/515 संदर्भातील दि. 12 जून 2026 पर्यंत झालेल्या सर्व नोंदी व आदेशांच्या प्रमाणित प्रती मिळण्यासाठी नियमानुसार अर्ज करूनही जवळपास महिनाभर उलटला तरी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
याबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश साळवे आणि विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधित मालमत्तेचे नामांतर आदेश, गहाणखत आदेश, हक्कसोड आदेश, वारसाहक्क आदेश, बक्षीसपत्र आदेश तसेच इतर सर्व नोंदींच्या प्रमाणित प्रती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित मालमत्तेप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या कागदपत्रांची अत्यंत तातडीने आवश्यकता आहे. मात्र अर्ज करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असून नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मुख्याधिकारी लक्ष्मण धस व विघ्नेश मुंडे यांनी संबंधित कागदपत्रांसाठी माहितीचा अधिकार (आरटीआय) अंतर्गत अर्ज करण्याचा सल्ला दिल्याचे राकेश साळवे म्हटले आहे. नियमित प्रक्रियेत उपलब्ध करून देता येणाऱ्या कागदपत्रांसाठीही नागरिकांना आरटीआयचा आधार घ्यावा लागणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची कबुली असल्याची टीका या वेळी राकेश साळवे यांनी केली.
नगर परिषदेकडे माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेले अनेक अर्ज आजही प्रलंबित असून त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही होत नसल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. संबंधित अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असून माहिती देण्याची जबाबदारी टाळत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मालमत्तेच्या सर्व प्रमाणित प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कायदेशीर लढा उभारण्याबरोबरच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राकेश साळवे व सिद्धार्थ ससाणे यांनी दिला आहे.



